41 जण जखमी : 13 मजली इमारतीत दुर्घटना
तैपेई / वृत्तसंस्था
दक्षिण तैवानमध्ये गुरुवारी 13 मजली निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 46 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 41 जण जखमी झाले. इमारतीतील रहिवासी झोपेत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडल्याने जीवितहानीचा आकडा वाढल्याचे काऊशुंग शहर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱयांनी एका निवेदनात म्हटले आहे. अग्निशमन दल शोध आणि बचाव कार्यात गुंतलेले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सदर इमारत 40 वर्षे जुनी असून तळमजल्यावर दुकाने आणि वरच्या बाजूला रहिवासी फ्लॅट्स आहेत. या दुर्घटनेत इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले. 11 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आणखी 35 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख ली चिंग-सिऊ यांनी पत्रकारांना दिली. अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने राबविलेल्या बचाव मोहिमेदरम्यान 55 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 41 जणांवर उपचार सुरू आहेत. किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे.