जगभरातील अनेक कंपन्या कोरोनाविरोधात लसयुद्ध करण्यासाठी सज्ज असताना तोंडावाटे सुलभ रितीने घेण्याचे औषध शोधण्यातही बरीच प्रगती झाली आहे. अमेरिकेत असे औषध शोधण्याचे प्रयत्न कसून होत असून भारतातही काही कंपन्या त्या दिशेने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत शोधण्यात आलेल्या औषधाचे आता प्राण्यांवर प्रयोग करण्यात येत असून ‘फेरेट’ या वन्य प्राण्यावर या औषधाचा सकारात्मक परिणाम 24 तासांमध्ये होते असे दिसून येते.
अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतीय विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात या औषधाचे संशोधन होत आहे. या औषधाचे सांकेतिक नामकरण एमके-4482-ईआयडीडी-2801 असे करण्यात आले आहे. हे औषध विषाणूंमुळे होणाऱया फ्ल्यू या विकारावर रामबाण असल्याचे सिद्ध झाले असून ते कोरोनावरही तितकेच परिणामकारक ठरेल अशी शक्यता संशोधकांनीं व्यक्त केली.
परीक्षण दुसऱया टप्प्यात
औषधाचे परीक्षण सध्या दुसऱया टप्प्यात असून त्याचे प्रयोग विविध प्राण्यांवर करून पाहिले जात आहेत. फेरेट या प्राण्याला कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे त्याच्यावर प्रयोग करण्यात आले. 24 तासांमध्ये या प्राण्यामधील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याचे अनुभवास आले. त्यामुळे संशोधकांच्या आशा पल्लवित झाल्या असून निर्धोक औषध निमितीत यश आल्यास ती सध्याच्या परिस्थितीत मोठीच दिलासादायक घटना असेल असे सांगण्यात आले. तसेच लसीपेक्षा औषध स्वस्तात उपलब्ध करून देता येणार असल्याने तो अतिरिक्त लाभ आहे.