अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र असणाऱया तज्ञांनीच उपचार करणे आवश्यक : त्वचारोग तज्ञांच्या परिषदेत डॉ. रवी राठोड यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
त्वचा अतिशय संवेदनशील असल्याने त्वचेचा कोणत्याही स्वरुपाचा आजार, विकार आणि डागांवर मान्यताप्राप्त व अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र असणाऱया त्वचारोग तज्ञांनी उपचार करणे आवश्यक आहे. परंतु आज अनेक तोतया त्वचारोगतज्ञ रुग्णांच्या त्वचेशी खेळ करत असून, त्यावर निर्बंध आणण्यासाठी आयएमएच्या सहकार्याने इंडियन असोसिएशन ऑफ डर्माटोलॉजिस्ट, व्हेनेरेलॉजिस्ट ऍण्ड लेप्रोलॉजिस्ट (आयएडीव्हीलएल) संघटना अशा तोतया डॉक्टरांविरूध्द मोहीम राबविणार आहे, अशी माहिती संघटनेचे राज्यस्तरीय अध्यक्ष डॉ. रवी राठोड यांनी दिली.
संघटनेची 13 वी राज्यस्तरीय त्वचा रोगतज्ञांची परिषद केएलईच्या जिरगे सभागृहात शुक्रवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी अनेक डॉक्टरांनी या शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रबंधही सादर झाला. शनिवारी दुपारी परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या अनुषंगाने बोलविलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राठोड बोलत होते.
डॉक्टरकडून रुग्णांची फसवणूक
ते म्हणाले, 1973 साली संघटनेची स्थापना झाली. आज 14 हजार सदस्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील ही दुसरी महत्त्वाची संघटना आहे. कर्नाटकमध्ये 1400 सदस्य आहेत. या क्षेत्रात त्वचेवर उपचार करतो असे सांगून अनेक तोतया डॉक्टर रुग्णांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे संघटनेने टास्कफोर्स स्थापन केले असून अशा डॉक्टरांविरुध्द मोहीम उघडणार आहे.
अनधिकृत ब्युटीपार्लरमध्येही लक्ष ठेवण्याची गरज
अनेक अनधिकृत ब्युटीपार्लरमध्येही ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यावरही आता लक्ष ठेवले जाईल. मात्र रुग्णांनी अधिकृत डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. झटपट उपचार होतात या कारणास्तव ग्राहक अशा तोतया डॉक्टरांकडे जातात. परंतु त्यामुळे त्यांची त्वचा, केस यांची हानी होते. अशा कोणत्याही तोतया डॉक्टरांकडून फसवणूक झाली असल्यास संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी परिषद उपयुक्त
परिषदेचे ऑर्गनायझिंग चेअरपर्सन डॉ. सुहास मांजरेकर यांनी परिषदेबद्दल माहिती देवून या शाखेचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांसाठी परिषद उपयुक्त ठरणार आहे, असे सांगितले. यावेळी डॉ. शिवकुमार पाटील, डॉ. विरेश द्यावण्णावर, परिषदेचे कोचेअरमन डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते.