मध्यरात्रीच्या सुमारास पशूखाद्य भरलेला ट्रकही गायब : दोन्ही घटनांनी शहरात खळबळ
प्रतिनिधी/ संकेश्वर
संकेश्वर बसस्थानकानजीकच्या सर्कलमध्ये तोतया पोलिसांनी एका नागरिकाची दिशाभूल करून त्याच्याकडील 5 तोळे सोन्याचे दागिने लांबवले. तसेच मध्यरात्री पशूखाद्य भरुन थांबलेला ट्रकही चोरटय़ांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यात सुमारे 19 लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लांबविल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, रविवारी सायंकाळी निगौंडा पाटील (रा. नवी गल्ली संकेश्वर) हे आपल्या दुचाकीने बसस्थानक सर्कल परिसरात आले होते. याठिकाणी त्यांना दोघा तरुणांनी गाठले व आपण पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र दाखविले. तसेच पुढे 5 लाख रुपयांची चोरी झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांचा तपास करीत आहोत. आपल्याकडे जे काही आहे ते या रुमालात ठेवा, असे सांगितल्यामुळे पाटील यांनी तातडीने आपल्याकडील साडेचार तोळय़ाची चैन व अर्धा तोळय़ाची अंगठी रुमालात ठेवली. त्या दोघांपैकी एकाने रुमाल बांधला व पाटील यांच्याकडे रुमाल दिला व यानंतर ते दोघे तेथून निघून गेले. यानंतर पाटील यांनी रुमाल सोडून पाहिले असता त्यात त्यांना दागिने नसल्याचे आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी आरडाओरड केली. पण तत्पूर्वी ते भामटे येथून पसार झाले होते.
ट्रकही चोरटय़ांनी लांबविला
दरम्यान ही घटना होऊन घडलेल्या अवघ्या 7 तासांनी म्हणजे रात्री 1 च्या सुमारास संकेत सुरेश संसुद्धी (रा. होनगा) यांच्या मालकीचा टाटा ट्रक ( केए 22 बी 5149) कोल्हापूरहून पक्ष्यांचे खाद्य भरुन बसस्थानकाच्या बाजूलाच बसवेश्वर खानावळीनजीक रात्री 10 वाजता येऊन थांबला होता. ट्रकच्या चालकाचे घरही नजीकच वड्डर गल्लीत आहे. ट्रक थांबवून चालक घरी झोपला होता. अज्ञात चोरटय़ांनी हा ट्रकही पळविला आहे. सकाळी 6 वाजता चालक ट्रकच्या दिशेने निघाला असतानाच ट्रक त्याठिकाणी नसल्याचे दिसून आले. लागलीच त्याने इतरत्र शोधाशोध चालवली. पण त्याचा पत्ता लागला नाही. या दोन्ही घटनांची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.
ट्रक सीसी कॅमेऱयात कैद
येथील साई बार व पोलीस ठाण्याच्या सीसी कॅमेऱयात रात्री ट्रक मूळ ठिकाणाहून तो बेळगावकडे निघाला असल्याचे पहावयास मिळाले. पण हत्तरगी टोल नाक्यावर ट्रकची नोंद झाली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे कोणत्यातरी दुसऱया मार्गानेच ट्रक गेला असणार असा कयास पोलिसांकडून लावण्यात येत आहे. गत महिन्यात हेब्बाळ पेट्रोल पंपात थांबलेला ट्रक चोरटय़ांनी पळवून तो बोरवलच्या डोंगरात नेत तेथे ट्रकचे टायर काढून सोडून दिला होता. असाच प्रकार पुन्हा घडला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.