प्रतिनिधी / पणजी :
एक कुठला बाहेरील राज्यातील सामान्य नागरीक आपल्या समुहासोबत एक मंत्री म्हणून दाखल होतो आणि कुठल्याही प्रकारची शाहनीशा न करता गोवा सरकार त्याला पूर्ण साधनसुविधा देते. स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या जाळय़ात फसले. हे खुप लज्जास्पद आहे. गोवा सरकारची तिजोरी ही सर्वसामान्यांकडून कर आकारुन भरली जाते त्यामुळे हा गोमंतकींयाचा अपमान असून राज्याचे शिष्टाचारमंत्री माव्हिन गुदिन्हो यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांची माफी मागावी अशी मागणी गोवा महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.
शनिवारी पणजी येथील काँग्रेस हाऊस येथे आयोजित पत्रकार परीषदेत प्रतिमा कुतिन्हो बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत पार्वती नार्वेकर, रेश्मा सय्यद, ग्रिसेल डिसोझा, व रोशनी डिसिल्वा उपस्थित होत्या.
भाजप सरकारची हालत ‘आ बैल मुझे मार’ अशी झाली आहे. पक्षाच्या नावाखाली कुणी येऊन काहीही करत आहे. ही खुप दुदैवी गोष्ट असून यावरुन राज्यातील सर्वसामान्य जनेतेच्या सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपच्या पदाधिकाऱयांना एवढेही ज्ञान नाही की उत्तर प्रदेशचा मंत्री गोव्याच्या विकासासाठी निधी कसा जाहीर करु शकतो. हा फक्त केंद्रीय मंत्र्यांना अधिकार आहे. सुनिल सिंग या नावाने दाखल होत या तोतया मंत्र्याने गोवा सरकारचा व गोमंतकीय जनतेची थट्टा केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची कसून चौकशी झाली पाहीजे. त्याप्रमाणे त्यांच्यावर 420 कलमाखाली फसवूण म्हणून गुन्हा नोंद करावा. तसेच त्यांनी वापरलेल्या सर्व सुविधांचा खर्च त्यांच्याकडून काढून घ्यावा व त्यांच्यावर कडेकोड कारवाई करावी जेणेकरुन त्यांना पाहून अशाप्रकारचे कृत्य करण्याचा विचार देखील कुणाच्या डोक्यात येता नये. असेही कुतिन्हो यांनी अधिक बोलताना सांगितले.
हल्लीच क्रीडा खात्यात एक माणूस आपण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकराचा नातेवाईक असे सांगून खेळाचे सामग्री घेऊन गेला. हे राज्यात काय चाललय कळत नाही. क्रीडामंत्री मनोहर आजगांवकर हे सनर्बन सारख्या पाटर्य़ांमध्ये नाचन्यात व्यस्त आहे. मंत्री, आमदार आपल्या मित्रपरीवारासोबत सरकारच्या खर्चाने जग फिरायला जातात. राज्यात वेश्या व्यावसाय, ड्रग्स व्यावसाय मोठय़ा प्रमाणात वाढत चालला आहे. सरकारला लोकांची काहीही पर्वा नाही आहे. असा आरोप प्रतिमा कुतिन्हो यांनी यावेळी केला. वरील सर्व गोष्टी संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी कुतिन्हो यांनी यावेळी केली.