हलगा-मच्छे बायपास प्रकरणात शेतकऱयांना मोठा दिलासा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्ता बेकायदेशीररित्या पूर्ण करण्याची धडपड करणाऱया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. जोपर्यंत या खटल्याची सुनावणी होत नाही तोपर्यंत शेतकऱयांच्या जमिनीमध्ये पाय देखील ठेवायचा नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आठवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने दिला आहे. यामुळे शेतकऱयांचा मोठा विजय झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला शेतकऱयांनी हिसका दाखविला आहे.
शेतकऱयांच्यावतीने ऍड. रवीकुमार गोकाककर यांनी न्यायालयामध्ये आयए क्रमांक 3 नुसार अर्ज दाखल केला होता. हा अर्ज रद्दबातल ठरवावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी अनेकवेळा प्रयत्न केले. मात्र शेतकऱयांचे वकील गोकाककर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास वारंवार हा रस्ता बेकायदेशीर कसा आहे, हे कागदपत्रांसह दाखवून दिले. शेवटी न्यायालयाने शेतकऱयांची बाजू उचलून धरत हा निकाल दिला आहे.
ऍड. गोकाककर यांनी हलगा-मच्छे बायपास हा राष्ट्रीय महामार्ग असल्याचा पुरावा नसल्याचे न्यायालयासमोर मांडले. याचबरोबर झिरोपॉईंटबाबत देखील राष्ट्रीय महामार्गाकडे कोणताही पुरावा नाही. हा रस्ता करण्यापूर्वी संसदेमध्ये चर्चा करुन नोटिफिकेशन झाले पाहिजे होते. मात्र संसदेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसताना हे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची बाजू ग्राहय़ मानत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत, असे न्यायालयासमोर सांगितले. सर्व जमीन ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे.
शेतकऱयांचा यामध्ये काहीही संबंध नाही. हा रस्ता झाला नाही तर मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा आयए क्रमांक 3 चा अर्ज फेटाळावा, अशी मागणी केली होती. मात्र ऍड. रवीकुमार गोकाककर यांनी शेतकऱयांची बाजू ठामपणे मांडत शेतकऱयांना दिलासा दिला आहे.
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन आता जोपर्यंत या खटल्याची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या जमिनीमध्ये पाय देखील ठेवायचा नाही, असा निकाल दिला आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.