श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई ः वेगवेगळय़ा दोन ठिकाणी चकमक
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी येथे लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सलीम पर्रे याच्यासह दोघांचा खात्मा केला आहे. सलीमवर 2016 मध्ये 12 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. पर्रेसोबत एक पाकिस्तानी दहशतवादीही मारला गेल्याची माहिती काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी दिली. श्रीनगर पोलिसांनी सोमवारी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर सलीम पर्रे आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज हमजा यांना ठार केले. शालिमार गार्डनजवळ दुपारी चार वाजता सलीम पर्रे याची सुरक्षा दलाशी चकमक झाली. याचदरम्यान शालीमार परिसरातील गासू येथे हाफिज हमजा मारला गेला. बांदीपोरा येथे दोन पोलिसांच्या हत्येत हमजाचा हात होता. या संपूर्ण कारवाईत कोणत्याही नागरिकाला इजा झालेली नाही. या दोन्ही कारवायांनंतर पोलीस महासंचालकांनी संबंधित पोलीस जवानांचे अभिनंदन करत विशेष बक्षीस जाहीर केले आहे.
दरम्यान, जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये रविवारी मध्यरात्री बीएसएफच्या जवानांनी एका घुसखोराला गोळय़ा घालून ठार केले. यापूर्वी कुपवाडय़ातील केरन सेक्टरमध्ये एलओसी ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱया एका पाकिस्तानी घुसखोराला भारतीय जवानांनी गोळीबारात ठार केले होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये एका बनावट लष्करी अधिकाऱयाला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर लष्कराचा गणवेश घालून फिरत असल्याचा आणि लष्करी अधिकारी असल्याचे भासवल्याचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांबा जिल्हा पोलिसांनी सांगितले.