ऑस्ट्रेलिया, न्युझिलंडमध्ये आढळतो, भारतात पहिल्यांदाच नोंद : सीएमएफआयआरचे शास्त्रज्ञ डॉ. रामकुमार यांची माहिती
मालवण :
दांडी येथील रापणीच्या जाळय़ात सापडलेला तो महाकाय जेलिफिश ‘सायनिया रोझी’ प्रजातीतील असून ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड लगतच्या पॅसिफिक महासागरात तो आढळतो. भारतात या प्रजातीची नोंद सर्वप्रथम मालवणला झाली आहे. प्रथमदर्शनी त्याच्या स्थलांतरामागची कारणे नैसर्गिक वाटत नाहीत. मोठमोठी जहाजे एका देशातून दुसऱया देशात ये-जा करीत आहेत. या जहाजांमध्ये जेव्हा समुद्राचे पाणी घेतले जाते आणि सोडले जाते, तेव्हा तो अपघाताने भारतीय समुद्रामध्ये आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत केंद्रीय मत्स्यकी संशोधन संस्था वर्सोवा-मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. रामकुमार यांनी व्यक्त केले.
डॉ. रामकुमार हे विशेषकरून जेलिफिशचा अभ्यास करतात. देशाच्या विविध किनाऱयांवर आढळणाऱया जेलिफिशची माहिती ते घेत असतात. स्थानिक मच्छीमारांकडून जेलिफिशची छायाचित्रे आणि चित्रफिती मागवून त्याद्वारे ते अभ्यास करीत असतात. दांडी येथे सापडलेल्या महाकाय जेलिफिशची छायाचित्रे आणि चित्रफित त्यांना पाठविली असता हा जेलिफिश ‘सायनिया रोझी’ असल्याचे त्यांनी सांगितले. या जेलिफिशमुळे मच्छीमारांनी घाबरण्याचे कारण नाही. हा जेलिफिश एकटाच राहत असतो. इतर जेलिफिशप्रमाणे त्याच्या झुंडी आपणास पाहायला मिळत नाहीत. एका देशातून दुसऱया देशात जाणाऱया जहाजांमुळेच कदाचित तो स्थलांतरित झाला असण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी दांडी येथेच रापणीच्या अशाच प्रकारचा जेलिफिश सापडला होता. भारतात ‘सायनिया रोझी’ची ही पहिलीच नोंद असल्याचे डॉ. रामकुमार म्हणाले.