महामार्ग ठेकेदार अभियंत्यांकडून कणकवली नगराध्यक्षांना आश्वासन : घटनास्थळाची केली पाहणी
कणकवली:
येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयानजीक गेली तीन वर्षे सातत्याने साचत असलेले पाणी निचरा करण्याबाबत लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनीला दिलेल्या इशाऱयानंतर अखेर ठेकेदार कंपनीच्या मेंटेनन्स विभागाचे अभियंता धीरज पाटील यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. तसेच हे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले.
ठेकेदार कंपनीच्या चुकीच्या कामामुळे सार्वजनिक बांधकाम कार्यालयानजीक असलेल्या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी साचत असलेले पाणी निचरा होण्यासाठी मार्ग नव्हता. परिणामी, बांधकाम कार्यालय व तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या नलावडे यांनी ठेकेदार कंपनीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
पाणी निचरा होण्यासाठी साधारण दहा फुटापर्यंत चर खोदून त्यात पाईप घालण्याची सूचना उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली. बांधकाम कार्यालय ते नाल्यापर्यंत पाईप घालताना मध्ये येणारी पिकअप शेड हटवावी. याबाबत कार्यकारी अभियंता यांनी देखील हिरवा कंदील दिल्याचे नलावडे यांनी सांगितले. माती कोसळू नये यासाठी रिटनिंग वॉल करण्याची सूचना हर्णे यांनी केली. गोकुळधाम हॉटेलकडील नाल्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत. तर न. पं. मार्फतही नाल्याच्या जुन्या पाईपच्या ठिकाणी काही भाग मोकळा करण्यात आल्याचे नलावडे यांनी सांगितले.