अमेरिकेच्या संसदेतील हिंसाचारावर भारतात राजकीय वादावादी, दंगलखोरांपैकी एकाकडे भारताचा ध्वज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेच्या संसदेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता भारताच्या राजकीय क्षेत्रात उमटताना दिसत असून भाजप आणि काँगेस यांच्यात संघर्षाची नवी ठिणगी पेटली आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन येथील कॅपिटॉल हिल येथे दंगल केली होती. या दंगलीत एका भारतीय वंशाच्या ट्रंप समर्थकाने भारताचा राष्ट्रध्वज फडकावत भाग घेतला होता. यामुळे बरेच मोठे वादंग माजले आहे. हा युवक काँगेस नेते शशी थरूर यांचा समर्थक असल्याचे एका प्रसिद्ध वृत्तपत्राने स्पष्ट केले आहे.
या युवकाचे नाव व्हिन्सेंट झेवियर असे आहे. तो मूळचा केरळ राज्यातील आहे. त्याने ट्रप समर्थकांसह कॅपिटॉल हिल येथे जाताना भारताचा ध्वज हाती धरला होता. या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रण आता समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध होत आहे. हिंदुत्व वॉच नामक एका वेबसाईटवर हा युवक ‘मोदीभक्त’ असल्याचे वृत्त काही बनावट छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली होती. तथापि, भारतातीलच एका प्रसिद्ध वृत्तपत्राने या वेबसाईटवरच्या वृत्ताची पडताळणी केली असता हे वृत्त निखालस खोटे आणि पंतप्रधान मोदींची, तसेच भाजपची बदनामी करण्यासाठी प्रसारित केल्याचे आता उघड होत आहे. हा युवक उलट काँगेस नेते थरूर यांचा समर्थक असून हिंदुत्व, मोदी आणि भाजपचा विरोधक असल्याचे स्पष्ट होत आहे.
हिंदुत्वाचा विरोधक
हिंदुत्व वॉच या वेबसाईटने या वृत्तासह प्रसिद्ध केलेली छायाचित्रे बनावट असल्याचे या वृत्तपत्राच्या पडताळणीत आढळून आले. तसेच हा युवक हिंदू नसून त्याचे नाव व्हिन्सेंट झेवियर असल्याचे व तो ख्रिश्चन असल्याचेही स्पष्ट झाले. याच व्यक्तीने त्याच्या अनेक समाज माध्यम संदेशांमध्ये तो शशी थरूर यांचा समर्थक असल्याचे, तसेच हिंदुत्व आणि मोदी तसेच भाजप यांचा विरोधक असल्याचे उघडपणे म्हटले आहे. त्यामुळे त्याचा कोणत्याही हिंदू संघटनेशी संबंध नसून तो हिंदुत्वाचा विरोधक असल्याचे दिसून येत आहे. या युवकाने भारताचा ध्वज दंगलीच्या वेळी हाती धरण्यावरून आता भारतात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप आणि काँगेस यांच्यात नवा वाद निर्माण होईल अशी चिन्हे आहेत. हा युवक काँगेस नेत्याचा समर्थक असल्याचे दिसून आल्याने वादावादीला वेगळा रंग प्राप्त होईल, अशीही शक्यता आहे.
त्याने असे का केले व्हिन्सेंट झेवियर हा युवक अमेरिकेत वास्तव्यास असून तो ट्रंप समर्थक आहे. अमेरिकेत अनेक देशांमधून लोक वास्तव्यास आलेले आहेत. कोणत्याही वंशाच्या किंवा रंगाच्या लोकांना ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षात स्थान व मान आहे. हा पक्ष वर्णभेद किंवा वंशवाद मानत नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण कॅपिटॉल हिलमध्ये अन्य समर्थकांसह गेलो होतो. आपल्या हाती भारताचा ध्वज होता, अशी सारवासारवी करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.