ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद झाल्यापासून एक जर्मन नागरिक दिल्ली विमानतळावरच राहत असल्याची बाब समोर आली आहे. ही व्यक्ती 18 मार्चपासून दिल्ली विमानतळावरील टर्मिनल तीनच्या ट्रान्झिट एरियात राहत आहे. त्याला विमानतळावरील अधिकारी आणि अन्य कर्मचारी अन्न पुरवत आहेत.
हा व्यक्ती हुनोईहून इस्तानबुलला निघाला होता. त्याचा विमान प्रवास दिल्लीमार्गे असल्याने 28 मार्चला तो दिल्लीत आला. त्यादरम्यान आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आणि तो दिल्ली विमानतळावरच अडकून पडला. त्याच्यावर जर्मनीत गुन्हे दाखल असल्याने त्याला पुन्हा जर्मनीत जायचे नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरळीत होईपर्यंत तो तिथेच थांबणार आहे.
विमान वाहतूक मंत्रालय आणि जर्मन दूतावसाला या व्यक्तीबद्दल माहिती देण्यात आली आहे. नागरी विमान मंत्रालय या व्यक्तीबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते.