चेन्नई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्स संघाने नव्याने करारबद्ध मोईन अलीला संघाच्या जर्सीवरील एसएनजे डीस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड संघाचा लोगो हटवण्याची परवानगी दिली आहे. विशिष्ट समाजातील खेळाडू मद्य कंपनीच्या जाहिराती करत नाहीत. त्यानुसार, मोईन अलीला चेन्नई संघव्यवस्थापनाने ही मुभा दिली आहे. एसएनजे डीस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यंदा चेन्नई सुपरकिंग्स संघाचे लोगो स्पॉन्सरर असून या करारानुसार संघातील खेळाडूंच्या जर्सीवर या कंपनीचा लोगो असणार आहे. याशिवाय, ब्रिटीश एम्पायर लोगो हेल्मेटच्या मागील बाजूस असणार आहे.
मोईन अलीने आपल्या समाजातील परंपरेशी निगडीत राहत आपल्या जर्सीवरील लोगो हटवावा, अशी खास विनंती चेन्नई व्यवस्थापनाला केली होती आणि त्यांनीही यासाठी होकार दिला. चेन्नई संघात इम्रान ताहीर व केएम असिफ या खेळाडूंचा देखील समावेश असून यापूर्वी ताहीरने देखील मद्य कंपनीचे लोगो असलेले जर्सी घालण्यास नकार दिला होता.
मोईन अलीने मद्य कंपनीच्या जाहिरातीत सहभागी न होण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. यापूर्वी, इंग्लंडने 2019 विश्वचषक जिंकला, त्यावेळी संघातील खेळाडूंनी शॅम्पेन उडवले, त्यावेळी मोईन अली त्यातून तत्काळ बाजूला झाला होता.