लॉस एंजिल्स / वृत्तसंस्था
एनबीए सुपरस्टार कोबे ब्रायंट हेलिकॉप्टर अपघातात आपली कन्या व अन्य 6 जणांसह मारला गेला, त्यावेळी प्रतिकूल वातावरणातही पायलट ऍरा झोबायनला हवेत भरारी घेण्याची सूचना ब्रायंटचीच होती, असे एनटीएसबी या फेडरल सेफ्टी इन्व्हेस्टिगेटर्सच्या अहवालात नमूद केले गेले आहे. 26 जानेवारी 2020 रोजी झालेल्या त्या भीषण अपघातात कोबे ब्रायन्टसह 9 जणांचा बळी गेला होता.
सदर अपघात घडला, त्यावेळी एनटीएसबीने (नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड) यासाठी पायलट झोबायनला जबाबदार धरले होते. प्रचंड ढगाळ वातावरण असल्याने वास्तविक त्यातून मार्गोत्क्रमण करणे धोक्याचेच होते. पण, तरीही ब्रायन्टने आग्रह धरला आणि झोबायन या अनुभवी पायलटने आपल्या सरावात मिळालेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत, फ्लाईट नियमांचे उल्लंघन करत उड्डाण भरले होते.
दक्षिण कॅलिफोर्नियाच्या डोंगराळ भागातून मार्गोत्क्रमण करत आहोत, असाच त्याचा बराच काळ अंदाज होता. पण, नंतर लँडिंग किंवा ऑटोपायलटकडे स्वीचिंग करण्याचा पर्याय त्याला अमलात आणता आला नाही आणि सिकोर्स्की एस-76 बी हे हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला. अपघात झाला, त्यावेळी सदर हेलिकॉप्टर प्रतितास 184 मैल वेगात होते. व्हेंच्युरी काऊंटी येथे माम्बा स्पोर्ट्स अकादमीच्या एका सामन्यासाठी ब्रायन्ट व त्याचा समूह हा प्रवास करत होते. सदर हेलिकॉप्टरमध्ये ब्लॅक बॉक्स डिव्हाईस नव्हते. त्यामुळे देखील या अपघाताचा आणखी अचूक माग घेणे शक्य झाले नाही.
अगदी उत्तम पायलट देखील अतिशय खराब निर्णय घेऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे, असे एनटीएसबीचे अध्यक्ष रॉबर्ट सुमवाल्ट सदर अपघाताची चौकशी केल्यानंतर अहवालात म्हणाले. ढगाळ वातावरणातून मार्गोत्क्रमण करत आपण त्यातून बाहेर पडू शकू, असा अंदाज वर्तवणे चुकीचे होते, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.