प्रतिनिधी/ पणजी
गोव्याच्या किनारपट्टीपासून 190 किमी दूर असलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा धोका आता टळला असला तरी हे वादळ गोव्यापासून उत्तरेकडे सरकताना समुद्राच्या लाटांनी जे रौद्ररुप धारण केले त्यातून आगोंद, गालजीबाग किनारपट्टीपासून मोरजी, मांद्रे पर्यंतच्या किनारपट्टीची धूप झालेली आहे. अनेक होडय़ांचेही बऱयाच प्रमाणात नुकसान झाले. गालजीबाग व आगोंद परिसरातील वाळूचे पट्टे नष्ट झाले. राज्यात या वादळामुळे रात्री उशिरा सर्वत्र जोरदार पाऊस झाला. आजही गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली.
‘तौक्ते’ चक्रीवादळ गोव्यापासून उत्तरेकडे म्हणजेच गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने गोव्यावरील धोका पूर्णतः टळला. चक्रीवादळाच्या या पार्श्वभूमीवर शुक्रवार रात्री गोव्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी विजा कोसळल्या. गोव्यात सर्वत्र बऱयापैकी पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळ पासूनच पावसाळी वातावरण होते. राज्यातील काही भागात सकाळी जोरदार पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी उशिरा गोव्यात बऱयाच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मात्र चक्रीवादळाचा थेट परिणाम गोव्यावर झाला नाही. गोव्यात सर्वत्रच जोरदार वारे वाहत होते.
गोव्याच्या किनारपट्टीवरुन जोरदार वादळी वारे वाहत होते. त्याचबरोबर समुद्राच्या लाटांनी थैमान घातले. परिणामी समुद्राचे पाणी अनेक सखल भागात शिरले. काणकोणपासून पेडणे तालुक्यातील समुद्रकिनाऱयावर दोन दोन मीटर उंचीच्या आलेल्या लाटांनी किनाऱयाची धूप वाढली. तेथील वाळूही नष्ट झाली. त्याचबरोबर किनारपट्टीतील काही झाडे उन्मळून पडली. कोणकोणमधील अनेक किनारी भागातील दुकानांमध्ये समुद्राचे पाणी लाटांबरोबर वर आले व अनेकांचे बरेच नुकसान झाले. किनारपट्टीवर बांधून ठेवलेल्या यांत्रिकी होडय़ांनीही समुद्रांच्या लाटांचा तडाखा बसला आणि कित्येक होडय़ांचे नुकसानही झाले. किनारपट्टीवरील घरांना सायंकाळी उशिरा जोरदार वादळी वारे व समुद्रांच्या लाटांचा तडाखा बसला.
एनडीआरएफचे पथक गोव्यात दाखल
दरम्यान, गोव्यावरुन जाणाऱया चक्रीवादळाच्या तडाख्याने कोणतीही जीवितहानी होऊ नये व गरज पडल्यास जनतेला मदत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील बचाव कार्याचे जवान खास गाडय़ा घेऊन शनिवारी पहाटेच पुण्याहून गोव्याला आले. धोक्याचा इशारा लक्षात घेऊन या पथकाने सरकारी यंत्रणेला देखील जागृत केले. परंतु ‘तौक्ते’ वादळाने गोव्यापासून 150 किमी दूर होते ते 190 किमी दूर गेले. त्यातून गोव्यावरील धोका जवळपास टळला आणि गोवा सुरक्षित राहिल्याने या पथकाने सुटकेचा निश्वास सोडला.
आज जोरदार पाऊस शक्य
दरम्यान, या वादळाबरोबरच येणाऱया पावसाने गोव्यात ठाण मांडले. आज राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. आजही समुद्र खवळलेला आहे. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार लाटा येतील असा अंदाज वर्तविला आहे. गेले 3 दिवस केरळ, कर्नाटक व गोव्यातील मच्छीमारांना समुद्रात जाण्यास हवामान खात्याने बंदी घातलेली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 मेपर्यंत गोव्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.
मुरगावला पावसाने झोडपले!
गेल्या 24 तासात अर्थात शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस पहाटेपर्यंत काही भागात पडत होता. मुरगावात सर्वाधिक 42.6 मि.मी. म्हणजेच दीड इंच पाऊस झालेला आहे. सांगे, म्हापसा येथे प्रत्येक पाउण इंच, दाबोळीत 1 इंच, मडगावातही दीड इंच एवढा पाऊस पडला. केपेमध्ये सव्वा इंच तर जुने गोवे येथे 1 इंच पणजीत व पेडणेमध्ये सुमारे 1 से.मी. पाऊस पडला. सांखळीतही जोरदार पाऊस पडला मात्र वेधशाळेने त्याची नोंद केलेली नाही.