पुणे/प्रतिनिधी
भाजप खासदार संजय काकडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारलं आहे. संजय काकडेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत असल्याचं वक्तव्यकेलं आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या अजित पवारांना पत्रकारांनी याबद्दल विचारलं असता त्यांची विश्वासार्हता किती अशी विचारणा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांनी संजय काकडे यांच्या वक्तव्यासंबंधी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही”.
काय म्हणाले होते संजय काकडे
संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी काकडे यांनी “मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहिती आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक वक्तव्यं पहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत,” असा दावा संजय काकडे यांनी केला आहे.