ऑनलाईन टीम / मुंबई :
हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेवरुन संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असतानाच भाजपाच्या आमदाराने मुक्ताफळे उधळली आहेत. भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी बलात्कार थांबवण्यासाठी मुलींवर संस्कार करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून भाजपाला टोला लगावला आहे.
भाजपा आमदाराने केलेल्या वक्तव्याच्या हवाला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मुलीवर चांगले संस्कार केले, तर बलात्कार होणार नाहीत’, असे बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका आमदार महाशयांनी केले. एकीकडे आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळे त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीका केली आहे.
दरम्यान, भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटले की, मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणे हे सरकारचे काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणे त्यांना शालीन राहण्यास शिकवणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे.