साखळदंडात बांधलेले माकड अन् त्याचे पिल्लू
माणूस आणि प्राणी सोबत राहत आले आहेत. परंतु कालौघात माणूस हुशार होत गेल्याने त्याने प्राण्यांना स्वतःचा गुलाम करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या लाभासाठी माणूस या प्राण्यांना मारहाण देखील करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मनोरंजनासाठी प्राण्यांना पाळून, त्यांच्या गळय़ात, पायात, नाकात साखळदंड किंवा दोर घालून त्यांचे स्वातंत्र्य हिरावले जाते. सोशल मीडियावर मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराचे एक असेच हृद्रयद्रावक छायाचित्र व्हायरल होतेय, जे पाहून लोकांचे काळीज पिळवटून गेले आहे. अनेक युजर्सनी या मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱया लोकांच्या विरोधात स्वतःचा संताप व्यक्त केला आहे.
माकड आणि त्याच्या पिल्लाचे हे छायाचित्र बांगलादेशचे प्रसिद्ध छायाचित्रकार जीएमबी आकाश यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. पृथ्वी सर्व प्राण्यांसाठी निर्मिलेली आहे, केवळ माणसांसाठी नव्हे असे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. या छायाचित्रात माकड आणि त्याचे पिल्लू दोघेही साखळदंडात बांधलेले दिसून येते. कुणीतरी त्यांना गुलाम करून ठेवले आहे हे उघड आहे. गुलामीच्या बेडय़ा त्यांच्या गळय़ात असून त्याच्या वेदना त्यांच्या डोळय़ांमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
या छायाचित्राने मनाला हादरविल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर हे छायाचित्र पाहून अत्यंत अधिक वेदना होत असल्याचे दुसऱया युजरने नमूद केले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे अनेकांकडून म्हटले गेले. बांगलादेशी छायाचित्रकाराच्या पोस्टला आतापर्यंत 3 हजारांहून लाइक्स आणि शेकडो कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.