कोरोनाबाधित मातांच्या 225 बाळांना नर्सेसनी दिली मायेची ऊब
सुहास पाटील / उंडाळे :
कोरोनाच्या काळात माणसांची अनेक रुपे समोर आली. त्यात काही वाईट होती तर काही चांगली. असचं माणुसकीचं मन हेलावणारं रुप कराडच्या कृष्णा रुग्णालयात बघायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात या हॉस्पिटलमध्ये कोरोना पाॅझीटीव्ह असणाऱ्या 225 महिलांनी बाळांना जन्म दिला, मात्र त्या स्वतः पाॅझीटीव्ह असल्याने त्यांना बाळांना संभाळता येत नव्हते. अशावेळी त्यांच्या पिल्लांना हाॅस्पिटलमधल्या नर्सेसनी संभाळलं.
कोरोना काळात अनेक अडचणींना समोरे जावं लागलं. या रोगातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची लागण झाली, की कोणत्याही नातेवाईकाला रुग्णांबरोबर राहता येत नाही. या रोगाने अनेक गर्भवती महिलांनाही सोडलं नाही. त्यामुळे लागण झाली असताना बाळाला जन्म दिला की हे बाळ त्यांच्याबरोबर ठेवता येत नाही. त्या मातांच्याहातात बाळाला दिलं जाऊ शकत नाही. कोणताही नातेवाईकही त्या बाळाच्या जवळ जाऊ शकत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. कराडच्या कृष्णा रुग्णालयात 225 महिलांनी कोरोनाची लागण झाली असताना बाळांना जन्म दिला. या बाळांना सांभाळायचे कुणी हा प्रश्न होता. मात्र, हाॅस्पिटलमधल्या नर्सनी याची जबाबदारी घेतली. या छोट्याशा पिल्लांना आठ- दहा दिवस या नर्सेसनी आपल्या पंखाखाली घेतले आणि जपलं ही.