प्रतिनिधी/कोल्हापूर
शांती, त्याग आणि प्रेमाचा संदेश देणारा ख्रिसमस (नाताळ) हा सण शुक्रवारी (दि. 25) साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकती सर्व खबरदारी घेऊनच शहरातील सर्व चर्चमध्ये विविध वेळांवर उपासना केली जाणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक उपासनेसाठी केवळ 50 जणांनाच चर्चमध्ये प्रवेश द्यावा लागणार आहे. न्यू शाहूपुरीतील ऐतिहासिक वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये 4 सत्रात ख्रिस्तजन्मदिनाची इंग्रजी व मराठीत उपासना होईल. उपासनेसाठी 8.15, 9.45, 11.15, 12.45 वा. अशा वेळा निश्चित केल्या आहेत. महापालिकेजवळील शहर उपासना मंदिरातही दुपारी साडेचार आणि सायंकाळी 6 वाजता उपासना होईल. ज्यांना चर्चमधील उपासनेवेळी प्रवेश मिळणार नाही, त्यांनी चर्चच्या आवारात सोशल डिस्टन्सवर उभे राहून उपासना करता येणार आहे. उपासना झाल्यानंतर मात्र चर्च परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन सर्व चर्चेसच्या वतीने करण्यात आले आहे.
ऐतिहासिक वायल्डर मेमोरियल चर्च कमिटीने ख्रिश्चन बांधवांच्या उपासनेत खंड पडू नये, तसेच चर्च परिसरात गर्दीही होऊ नये यासाठी रोफे आणि आमेन या ऑनलाईन चॅनेलची व्यवस्था केली आहे. त्यामुळे चर्चमधील सर्व नियोजित वेळांवर दोन्ही चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना उपासना करणे अगदी सोपे होणार आहे. शहरातील सर्वच चर्चनी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत मराठीत उपासना केली जाईल. दरम्यान, ख्रिसमसच्या पुर्वसंध्येला समस्त ख्रिश्चन बांधव मदर मेरी व प्रभू येशूंच्या प्रतिमेसह जींगल बेल, प्लम केक, चीझकेक, पायनापलकेक, फ्रुटकेक, कपकेक, मिक्स फ्रुटकेट, स्ट्रॉबेरीकेक, चॉकलेट, ख्रिसमस-ट्री, सांताक्लॉजची प्रतिकृती, टोपी, भेटवस्तू, भेटकार्ड आदींची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठÎा संख्येने दाखल झाले होते. त्यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्च परिसराची साफसफाई ही करण्यात आली आहे. विविध रंगांमधील एलईडी ब्लबनी चर्चना रोषणाई देखील केली आहे. त्यामुळे चर्चला वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे. चर्चमध्ये उपासनेसाठी येणाऱया ख्रिश्चन बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न उद्धभवू नये, यासाठी चर्चना निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.