वृत्तसंस्था/ डब्लिन
पार्किंगमध्ये किंवा अगदी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारवर चेंडू आदळून काचांचे नुकसान होण्याचे प्रकार बऱयाचदा घडतात. पण, डब्लिनमध्ये एका प्रथमश्रेणी टी-20 लढतीत आयरिश फलंदाज केव्हिन ओब्रायनने षटकार खेचल्यानंतर चेंडू त्याच्या कारवरच जाऊन आदळला आणि काचेचा चक्काचूर झाला. एखाद्या फलंदाजाने षटकार खेचल्यानंतर त्याच्या कारवरच चेंडू आदळण्याची ही प्रथमश्रेणी क्रिकेटमधील देखील पहिलीच घटना असावी.
गुरुवारी झालेल्या या लढतीत ओब्रायनने 37 चेंडूतच 82 धावांची आतषबाजी केली आणि यात 8 उत्तूंग षटकारांचा समावेश होता. ओब्रायन यावेळी नॉर्थ वेस्ट वॉरियर्स संघाविरुद्ध लिन्स्टर लायटनिंग संघाचे प्रतिनिधीत्व करत होता.
‘ओब्रायनने उत्तूंग षटकार खेचला आणि त्याच्याच टोयोटा कोरोला हायब्रिड सेदान कारची काच फुटली’, असे क्रिकेट आयर्लंडने ट्वीट केले. शिवाय, सोबत ओब्रायनचा त्याच्या कारसमवेतचा फोटोही शेयर केला. केव्हिन ओब्रायन विस्फोटक फलंदाजीसाठी विशेष ओळखला जातो. विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत झंझावाती शतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्या खात्यावर नोंद आहे.