विविध महिला संघटनांतर्फे पोलीस उपायुक्तांना निवेदन – फाशी देण्याची केली मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने शहरात संताप व्यक्त करण्यात येत असून महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी रोशन डुपेज आणि आणखी एक अल्पवयीन संशयिताला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महिला फेडरेशन आणि जायंट्स सखी यांनी बुधवारी सकाळी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात फेडरेशनने म्हटले आहे की, तीन वर्षीय बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार ही अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे. पोलीस खात्याने याबाबत त्वरित कारवाई करून आरोपींना अटक केली. त्याबद्दल पोलीस खात्याला आम्ही धन्यवाद देतो. परंतु या संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
बहुतेकदा अशा घटनांमध्ये पालकांवर प्रचंड दबाव आणला जातो. त्यामुळे त्या बालिकेला आणि तिच्या कुटुंबीयांना नैतिक पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. तिच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे, असेही फेडरेशनने नमूद केले आहे. फेडरेशनच्या अध्यक्षा प्रमोदा हजारे यांच्यासह रुक्साना खेरीकर, दिलदार मोजेगार, दिलफरोज पटेल, नसरीम तल्लुर यांनी हे निवेदन दिले.
जायंट्स सखीतर्फेही निवेदन
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीनेही पोलीस उपायुक्तांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले आहे की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संशयित आरोपींना फाशीच दिली जावी. शिवाय बेळगाव बार असोसिएशनच्या कोणाही वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये.
पोलीस आयुक्त आणि अधिकारी या घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलतील आणि आरोपींना शिक्षा होईल या दृष्टिनेच प्रयत्न करतील, अशी अपेक्षाही जायंट्स सखीने केली आहे. जायंट्स सखी फेडरेशनच्या ज्योती अनगोळकर, अध्यक्षा नीता पाटील यांच्यासह अन्य सदस्या यावेळी उपस्थित होत्या.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी पोलीस खात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखले आहे. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून एफआयआर दाखल केला आहे. पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, या दृष्टिनेच पोलीस खाते प्रयत्न करेल. शिवाय त्या बालिकेच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य खचणार नाही, याची काळजी आम्ही घेवू. महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे, असेही डॉ. आमटे यांनी सांगितले.
यानंतर फेडरेशनच्या महिलांनी श्रीदेवी पाटील यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि सदर बालिकेला आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.