ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल दौऱ्यात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेत भाजपचे सचिव कैलास विजयवर्गीय हे जखमी झाले. दगडफेकीच्या या घटनेनंतर विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयवर्गीय यांना ‘झेड’ सुरक्षा आणि सोबतच बुलेप्रुफ गाडी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत पश्चिम बंगालची जबाबदारी विजयवर्गीय यांच्याकडे देण्यात आली आहे.
दगडफेकीच्या या घटनेनंतर भाजपने तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांनी देखील या घटनेचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 19 आणि 20 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत.