प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठवडय़ात विजयनगर व जयनगर परिसरात झालेल्या घरफोडय़ांचा अद्याप तपास लागला नाही. या प्रकरणात कोणत्या गुन्हेगारांचा सहभाग आहे याची माहिती मिळविण्यासाठी तपास अधिकाऱयांनी धडपड सुरु केली असून महाराष्ट्रालाही पोलीस पथके रवाना झाली आहेत.
गेल्या बुधवार दि. 7 ऑक्टोबर रोजी विजयनगर येथील एका तलाठय़ाच्या घराच्या खिडकीचे गज कापून 10 लाख रुपये लांबविण्यात आले होते. गुंडू पिराजी चौगुले (वय 61) यांनी या संबंधी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्याच दिवशी जयनगर येथेही घरफोडीचा प्रकार घडला होता.
श्रीधर परशराम सुलाखे (वय 28) यांच्या बंद घराच्या पहिल्या मजल्याचे खिडकीचे गज कापून चोरटय़ांनी सुमारे 22 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 2 लाख रुपये रोख रक्कम असा 24 लाखांचा ऐवज लांबविला होता. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केवळ बेळगाव परिसरात नव्हे तर महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरातही गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. खिडकीचे गज कापून घरफोडी करणाऱया टोळय़ा कोणकोणत्या राज्यात सक्रिय आहेत, यापूर्वी त्यांनी कोणत्या राज्यात गुन्हे केले आहेत, या विषयीचा तपशील मिळविण्याचे काम पोलीस अधिकाऱयांनी हाती घेतले आहे.