काही कालावधीपूर्वी ऋषभ पंतला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. थोडेफार यश मिळाल्यानंतर पंत हवेतही गेला आणि त्याने सातत्याने धोनीची ‘स्टाईल’ कॉपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कधी त्याने घाईघाईत अनेकाविध चुका केल्या तर कित्येकदा धोनीची स्टाईल मारण्याच्या प्रयत्नात डीआरएसही वाया घालवले. त्यानंतर संजू सॅमसन, केएल राहुलसारखे पर्याय आजमावून पाहिले जात असताना पंतने पुन्हा मेहनतीवर भर देण्याचा प्रयत्न केले. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने आपल्या यष्टिरक्षणातील गुणवत्तेची थोडीफार चुणूक दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण, आणखी एकदा त्याला अति हुशारी नडली आणि या चुकीमुळे तो नेटिझन्सच्या ट्रोलिंगचा चांगलेच सावज ठरला.
मंगळवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या लढतीत ऋषभ पंतने काही कालावधीकरिता उत्तम यष्टीरक्षण केले होते. पण, निकोलस पूरनला धावचीत करण्याच्या प्रयत्नात त्याने असा काही आगाऊपणा केला की, ते नेटिझन्सनी त्याला ट्रोल करण्यासाठी अगदी भरपूर झाले. पंतने येथे यष्टीकडे न पाहता धोनीच्या स्टाईलमध्ये थ्रो करुन यष्टीचा वेध घेण्याचा बालिश प्रयत्न केला. पण, पंतचा थ्रो भलतीकडेच गेला आणि एक नेटिझन ट्रोल करत म्हणाला, ‘कहा राजा भोज, कहा गंगू तेली’!
आणखी एका नेटिझनने नमूद केले, ‘कौवा कितना भी वॉशिंग मशीन मे नहा ले ऋषभ बाबू, बगुला नही बन सकता’!
एका नेटिझनने ऋषभला त्याच्या भाषेत समजावले, हा नेटिझन म्हणाला, ‘चिल्लाओ मत, ऍटॅक आ जाएगा’!