सर्वतोपरी सतर्कता : घाबरण्याचे कारण नाही – मेरीटाईम बोर्डाचे स्पष्टिकरण
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
चीनमधील ‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील रेडी बंदरात दाखल झालेल्या ‘नाथन ब्रॅन्डॉन’ जहाजाबाबत शुक्रवारी ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वेंगुर्ल्यात मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून वस्तुस्थितीबाबत महिती घेतली. दरम्यान, या जहाजाबाबत सर्व सतर्कता घेण्यात आली असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जहाजात लोहखनिज भरण्याचे कामही शनिवारी सुरू करण्यात आल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाकडून देण्यात आली.
शुक्रवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी प्रत्यक्ष मेरीटाईमशी संपर्क साधून माहिती घेतली तसेच प्रशासनाकडून काय मदत अपेक्षित आहे, याबाबत विचारणा केली. जिल्हा आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली. वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर यांनी मेरीटाईमच्या रेडी कार्यालयात भेट दिली. अधिकारी, कर्मचाऱयांना काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. स्थानिक जि. प. सदस्य प्रीतेश राऊळ यांनीही मेरीटाईमच्या अधिकाऱयांची भेट घेत माहिती घेतली.
एकूणच पार्श्वभूमीवर मेरी टाईमशी संपर्क साधला असता सांगण्यात आले की, सगळी तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सर्व काही सुरळीत आहे. हे जहाज सिंगापूरहून सुटले असून दहा दिवसांपूर्वी मुंबईत पोहोचल्यावर तेथे कसून तपासणी करण्यात आली. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कुणालाही लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. मुंबईत तपासणी झाली, तरी महिन्यापूर्वी चीनमधील कर्मचारी त्या जहाजात दाखल झाल्याने पुन्हा त्यांची तपासणी रेडी बंदरात करण्यात आली. त्यानंतरच खजिन भरण्याच्या कामाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. 55 हजार मे. टन क्षमतेच्या या जहाजामध्ये पूर्ण खनिज भरायला 15 दिवस लागणार असून नंतर हे जहाज चीनला रवाना होणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहनही मेरीटाईम बोर्डाकडून करण्यात आले.