पोलीस कोठडीत घेवून करणार तपास
प्रतिनिधी/ बेळगाव
थरारक पाठलाग करत झाडशहापूरजवळ रविवारी दुपारी अटक करण्यात आलेल्या दोन खतरनाक गुन्हेगारांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
प्रकाश विनायक पाटील (वय 37, मुळचा रा. सरस्वती रोड, शहापूर, सध्या रा. साखळी-गोवा), निथाई कालीपद मंडल (वय 41, रा. पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी या जोडगोळीला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले.
येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. मंगळवारी न्यायालयात पोलीस कोठडीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार असून न्यायालयाची परवानगी घेवून पुढील चौकशीसाठी या जोडगोळीला कोठडीत घेण्यात येणार आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील चन्नाप्पा हुंचाळ व योगेश तळेवाड या दोन पोलिसांनी झाडशहापूर येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठय़ा धाडसाने झडप घालून या जोडगोळीला अटक केली आहे. त्यांच्या जवळ चाकु, जांबिया, पिस्तुल, जीवंत काडतुसे आदी घातक शस्त्रs आढळून आले आहेत.
प्रकाश व निथाई हे दोघे जण घरफोडी करताना रंगेहात सापडले आहेत. त्यांची कसून चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. या जोडगोळीच्या चौकशीत मोठय़ा प्रमाणात गुन्हे उघडकीस येणार आहेत. कारण प्रकाश हा आंतरराज्य गुन्हेगार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
तीन राज्यात घरफोडय़ा
घरफोडी करताना रंगेहात सापडलेला प्रकाश पाटील हा मुळचा शहापूर, बेळगावचा आहे. सध्या सहकुटुंब साखळी-गोवा येथे त्याचे वास्तव्य आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा परिसरात त्याने घरफोडय़ा केल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 2015 मध्ये त्याला अटक केली होती. त्यावेळी सुमारे 800 ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले होते. यापूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देवून न्यायालय आवारातून पलायन करण्याचा प्रतापही प्रकाशने गाजविला आहे. प्रकाश हा खतरनाक गुन्हेगार आहे. दिवसा घरफोडय़ा करण्यात तो तरबेज आहे.