दिवसा घरफोडय़ांचा तपास प्रगतीपथावर, सातहून अधिक गुन्हय़ांची उकल
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या रविवारी भरदिवसा घरफोडी केल्यानंतर थरारक पाठलाग करून पोलीस व झाडशहापूरमधील शेतकऱयांनी ताब्यात घेतलेल्या जोडगोळीला सध्या पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सोमवारी कोठडीची मुदत संपणार असून त्यांना पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात येणार आहे.
प्रकाश विनायक पाटील (वय 37) मूळचा राहणार सरस्वती रोड, शहापूर सध्या राहणार साखळी-गोवा, निथाई कालिपद मंडल (वय 41) रा. पश्चिम बंगाल अशी त्यांची नावे आहेत. गेल्या रविवारी 6 डिसेंबर रोजी झाडशहापूरजवळ थरारक पाठलाग करत सशस्त्र टोळीतील या जोडगोळीला अटक करण्यात आली होती.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांना सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेतले आहे. या जोडगोळीने बेळगाव परिसरात सातहून अधिक घरफोडय़ा केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
सध्या त्यांना पोलीस कोठडीत घेऊन चोऱया, घरफोडय़ांचा तपास केला जात आहे. आणखी तपास शिल्लक असल्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात येणार आहे. या जोडगोळीच्या चौकशीअंती अनेक गुन्हय़ांचा उलगडा होणार आहे.