पक्षाशी विश्वासघात केल्याचा भाजपाकडून ठपका
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन मगो उमेदवाराला मतदान केल्याबद्दल त्या दोघा भाजपा नगरसेवकांवर पक्षातंर्गत कारवाई होणार आहे. या दोन्ही नगरसेवकांची ही कृती म्हणजे पक्षाशी विश्वासघात असल्याचा आरोप फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी केला आहे. मगो पक्षातील काही नगरसेवक लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी व नगरसेवक यतीश सावकार हे यावेळी उपस्थित होते. शुक्रवार 25 रोजी फोंडा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपामधील दोघा नगरसेवकांनी मगोच्या उमेदवार अमिना नाईक यांच्याबाजूने मतदान केल्याने भाजपाचे उमेदवार आनंद नाईक यांचा एका मताने पराभव झाला. अमिना नाईक यांना 8 तर आनंद नाईक यांना 7 मते मिळाली होती. यतीश सावकार हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने ते भाजपाच्या बाजूने राहिले होते. त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराला 15 पैकी 9 मते मिळणे अपेक्षित होते. या निकालातून भाजपामधील दोघा नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याचे उघड झाले आहे. हे दोन नगरसेवक कोण आहेत, याची पक्षाला कल्पना असून लवकरच त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार असल्याचे शांताराम कोलवेकर यांनी सांगितले.
मगोचे यतीश सावकार भाजपामध्ये
दरम्यान, नगरसेवक यतीश सावकार हे सोमवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती शांताराम कोलवेकर यांनी दिली. सावकार हे मगोच्या रायझिंग फोंडा गटातून फोंडा पालिकेवर निवडून आले होते. भाजपाची कार्यपद्धती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे यतीश सावकार यांनी सांगितले. शिवाय आपल्या सांताप्रुज या प्रभाग 3 मध्ये गेल्या काही दिवसात रखडलेली विकासकामे झटपट मार्गी लावल्याने व येणाऱया काळात अजून चांगली विकासकामे व्हावीत यासाठी आपण भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मगो पक्षातील अन्य काही नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती कोलवेकर यांनी दिली.