आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांची मागणी
प्रतिनिधी / राय
सांघिक जबाबदारीच्या तत्वांचा अवलंब करण्यात राज्य मंत्रिमडळातील बाबू आजगावकर व मायकल लोबो या मंत्र्यांना अपयश आल्यामुळे या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी कुडतरी मतदारसंघातील आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी केली आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या एका पत्रात आम. लॉरेन्सो यांनी ही मागणी केलेली आहे.
वरील दोन्ही मंत्री मनात येईल त्याप्रमाणे आपल्याच सरकारच्या धोरणाविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी सरळ सरळ बोलत आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सरकारची प्रतिमा पर्यायाने गोव्याच्या प्रतिमेला डाग लागत असल्याचे या पत्रात त्यांनी म्हटलेले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संमतीविना संवेदनशील आणि महत्वाच्या प्रश्नावर मंत्र्यांना इतर ठिकाणी बोलता येत नाही हे वरील दोन्ही मंत्री विसरलेले आहेत. गोव्यातील सर्वच्या सर्व 40 आमदार भ्रष्ट असल्याचा आरोप करून श्री. आजगावकर यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केल्यासारखे दिसत आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा सांभाळणाऱया कोणाही व्यक्तीला अशा प्रकारची वक्तव्ये सहन होणारी नाहीत. अशा प्रकारची वक्तव्ये जाहीररित्या करणाऱया मंत्र्यांना राज्य मंत्रिमडळातून डच्चू देण्यात यावा अशी विनंती आम. लॉरेन्सो यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात केलेली आहे.