प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. केवळ सहा दिवसांत शहर व जिल्हय़ात कोरोनामुळे पाच जण दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृतदेहांवर रविवारी दुपारी बेळगावात दफनविधी करण्यात आले.
कुडची, ता. रायबाग येथील एका 70 वषीय वृद्धाला श्वसनाचा त्रास जाणवल्याने शनिवारी पहाटे त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपासून त्याला खोकला आणि श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. दाखल होताच त्याचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वीरभद्रनगर येथील 48 वषीय रहिवाशालाही एका दिवसापूर्वीच श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. 3 जुलै रोजी रात्री अकरा वाजता त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ‘सारी’ प्रकरण असे गृहित धरून डॉक्टरांनी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. शनिवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री साडेसात वाजता त्याचाही मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्रीपासून या दोघा जणांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आले होते. केवळ त्यांचे काही कुटुंबीय तेथे होते. या मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणी करायचे? हा प्रश्न निर्माण झाला होता. कोविड-19 नियमानुसार अंत्यसंस्कार करावे लागणार होते.
कुडची, ता. रायबाग येथील वृद्धाच्या नातेवाईकांनी मृतदेह कुडचीला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाहन उपलब्ध झाले नाही. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समजताच कोणीच मृतदेह नेण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. तहसीलदार आर. के. कुलकर्णी व महानगरपालिकेचे बसवराज दबाडी हे सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारासमोर दाखल झाले.
या दोघा मृतांना दफन करण्यासाठी अंजुमन इस्लामच्या स्मशानभूमीत जागा देण्यात आली. कोविड नियमानुसार दुपारी 12 वाजता शवागारातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर एकाच ठिकाणी दोन्ही मृतदेह दफन करण्यात आले. यावेळी पाच नातेवाईकांना तेथे उपस्थित राहण्यास अनुमती देण्यात आली होती.
सहा दिवसात पाच बळी
बेळगाव शहर व जिल्हय़ात केवळ सहा दिवसांत कोरोनामुळे पाच जण दगावले आहेत. कोरोनाचा पहिला बळी 13 एप्रिल रोजी हिरेबागेवाडी येथील वृद्धेचा झाला होता. त्यानंतर 29 जूनपासून 4 जुलैपर्यंत अथणी तालुक्मयातील दोन, बेळगाव शहरातील दोन व कुडची, ता. रायबाग येथील एक अशा एकूण पाच जणांचे बळी गेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेणाऱया आणखी चौघा जणांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे बळींची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.