गोडोली / प्रतिनिधी
कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शहर आणि परिसरात मेडिकल मधून घरपोच औषधे करण्याची परवानगी दिली होती. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून काऊंटरवर औषधे विक्री केली जात असल्याचे तरुण भारत च्या पोलखोलने उघड केले आहे. दोषी असलेल्या प्रदिप आणि शैलेश मेडिकलचे परवाने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटाचे धास्तावलेल्या प्रशासनाने दोन महिन्यांत जमावबंदी लागू करून जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर सुध्दा निर्बंध घालते. यात घरपोच औषधे विक्रीसाठी शहर परिसरातील तब्बल ६६ मेडिकलला परवानगी दिली होती.यात कोणत्याही परिस्थितीत काऊंटरवर औषधे विक्री करायची नाही, असा आदेश दिला होता. मात्र सामाजिक भान विसरून पैशाची हाव सुटलेल्या पोवई नाक्यावरील प्रदिप आणि शनिवारी पेठेतील शैलेश मेडिकलच्या काऊंटरवर औषध विक्री करण्याचे धाडस केले.याचा पोलखोल तरुण भारत ने केला आहे. हे आता उघड झाले असून सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रांताधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहर अध्यक्ष राहूल पवार आणि सेनेचे अनेक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे. प्रशासनाने लाँकडाऊनच्या काळात केलेल्या नियम,आदेशाचे उल्लंघन केले की काय कारवाई केली जाते,याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.