मत्स्य आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी : रत्नागिरीतील त्या पर्ससीन नेटची माहिती घ्या! : नियमबाहय़ मासेमारीप्रकरणी झाली होती कारवाई
प्रतिनिधी / मालवण:
शासनाने लागू केलेल्या मासेमारी नियमांचे उल्लंघन करून नियमबाहय़ मासेमारी केल्याप्रकरणी मत्स्य विभागाने आजवर कारवाई केलेल्या रत्नागिरी जिल्हय़ातील ‘त्या’ सर्व पर्ससीन नौकांचे परवाने प्रथम रद्द करावेत, अशी मागणी पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी मत्स्य आयुक्तांकडे केली आहे.
मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांना पराडकर यांनी यासंबंधीचे निवेदन सादर केले. 5 फेब्रुवारी 2016 रोजी राज्य शासनाने पारित केलेल्या अधिसूचनेनुसार पर्ससीन नेट नौकांची संख्या कमी करण्यासाठी मत्स्य आयुक्तांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. परवानाधारक पर्ससीन नौकांचे परवाना नूतनीकरण करू नयेत, असे आदेश मत्स्य आयुक्तांनी 2 जुलै 2020 च्या पत्राद्वारे मत्स्य विभागाला दिले आहेत. 5 फेब्रुवारी 2016 च्या अधिसूचनेनुसार पर्ससीन नेट नौकांची संख्या कमी करत, ती 262 वर आणावी आणि अंतिम संख्या 182 वर आणावी, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार प्रथम रत्नागिरी जिल्हय़ातील पर्ससीन नेट नौकांची संख्या कमी करावी. 5 फेब्रुवारी 2016 च्या अधिसूचनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हय़ातील पर्ससीन नेट नौकांवर कारवाई झाली असल्यास त्यासंदर्भातील माहिती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य कार्यालयांकडून घेण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे पराडकर यांनी सांगितले.
रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमारही त्रस्त
रत्नागिरी जिल्हय़ात अनधिकृत पर्ससीन नेट मासेमारी मोठय़ा प्रमाणात होते. एलईडी दिव्यांच्या सहाय्याने होणाऱया बेकायदेशीर मासेमारीचे प्रमुख केंद्र रत्नागिरी हेच असल्याचे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी वेळोवेळी मत्स्य विभागाचे लक्ष वेधले आहे. तरीही नियमबाहय़ मासेमारी करणाऱया रत्नागिरीतील पर्ससीन नौकांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत. बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीविरोधात कडक कारवाई करावी, याकडेही पराडकर यांनी लक्ष वेधले आहे.