किंग्स्टन/ वृत्तसंस्था
महान धावपटू व 8 वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन युसेन बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह झाला असून याचवेळी ख्रिस गेलचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. दोनच दिवसांपूर्वी बोल्टने आपल्या 34 व्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत ख्रिस गेलसह मँचेस्टर सिटीचा स्टार फुटबॉलपटू रहीम स्टर्लिंग, बायर लिव्हरकुसेनचा स्ट्रायकर लियॉन बेली यांचाही समावेश होता. बोल्टने एका व्हिडीओद्वारे आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले.
‘मी यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार क्वारन्टाईन असेन आणि कोणाचीही भेट घेणार नाही. क्वारन्टाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार पुढील चाचणी करवून घेईन’, असे बोल्ट या व्हीडिओत म्हणाला.
दरम्यान, बोल्टच्या पार्टीत समाविष्ट असलेल्या ख्रिस गेलचा अहवाल दोनवेळा निगेटिव्ह आला असून यामुळे तो किंग्स इलेव्हन संघाच्या ताफ्यात दाखल होण्यास काहीच अडचण असणार नाही.
ख्रिस गेलचाही व्हीडिओ
ख्रिस गेलनेही एक व्हीडिओ पोस्ट केला. दुबईला रवाना होण्यापूर्वी स्वॅबसाठी नमुने घेतानाचा व्हीडिओ त्याने प्रसारित केला. गेलच्या या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. आता संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची आणखी एकदा चाचणी घेतली जाईल व त्यानंतर त्याला सक्तीचे 6 दिवस क्वारन्टाईन व्हावे लागेल. शिवाय, त्यानंतर पहिल्या, तिसऱया व पाचव्या दिवशी कोरोना चाचणी घेतली जाईल. या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तो संघातील खेळाडूंसमवेत सरावाला सुरुवात करु शकणार आहे.
जमैकाच्या आरोग्य मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार, जमैकात त्यामागील 24 तासात कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळून आले व एकूण रुग्णांची संख्या 1529 वर पोहोचली होती.
ख्रिस गेल यापूर्वी जानेवारीत आपली शेवटची व्यावसायिक लढत खेळला आहे. त्याने बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत चत्तोग्राम चॅलेंजर्स प्रँचायझीचे प्रतिनिधीत्व केले होते. 2020 कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही तो खेळणार होता. पण, वैयक्तिक कारणास्तव त्याने सेंट किट्स व नेव्हिस पॅट्रिअट्समधून त्याने माघार घेतली.
आयपीएल स्पर्धेत सहभागी प्रँचायझी किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ मागील आठवडय़ात संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाला असून सध्या त्यांनी 6 दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण केले आहे. यापूर्वी या संघातील भारतीय फलंदाज करुण नायर मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. पण, नंतर दोन आठवडय़ांच्या आयसोलेशननंतर दोन चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी पंजाब संघात दाखल होऊ शकला आहे.