पोलीस भरती परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
नागरी पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून रविवारी रामतीर्थनगर येथे जिल्हा सीईएनच्या अधिकाऱयांनी अटक केलेल्या बारा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी दिली आहे.
येथील सरदार्स हायस्कूल व सीपीएड कॉलेज मैदानाजवळील वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत गैरप्रकार करताना दोन परीक्षार्थींसह चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. याच प्रकरणाची पुढील कारवाई म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थनगर येथे छापा टाकून बारा जणांना अटक करण्यात आली होती.
या सर्व बारा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करून मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे घबाड जप्त करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांपैकी बहुतेक जण गोकाक, मुडलगी, रबकवी, बनहट्टी, चिकोडी, सौंदत्ती, बेळगाव परिसरातील राहणारे आहेत. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून पोलीस भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार करण्यात येत होता.
जिल्हा सीईएन पोलिसांच्या सतर्कतेमुळे परीक्षेत गैरप्रकारात गुंतलेली मोठी टोळी गजाआड झाली आहे. शहर पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात गैरप्रकार घडूनही कारवाई का केली नाही? या गैरप्रकारांकडे कानाडोळा का करण्यात आला? आदी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस दलातही हा विषय चर्चेचा बनला आहे.
बेंगळूर येथील वरि÷ांना परीक्षेतील गैरप्रकार कळल्यानंतर त्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली. खरे तर रविवारी दुपारी 1.30 वाजता परीक्षा संपली. मात्र जिल्हा पोलिसांची कारवाई होईपर्यंत परीक्षार्थींना परीक्षा केंद्रातून बाहेर पाठवायचे नाही, अशी सूचना करण्यात आली होती. बेळगाव जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यातील विविध भागात गैरप्रकार करणाऱयांना अटक झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेंगळूर, गुलबर्गा, हावेरी, मंगळूर परिसरातही परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचहून अधिक जणांना अटक झाली असून दोघेजण फरारी झाले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार थोपविण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षार्थी व गैरप्रकारात त्यांना मदत करणाऱया टोळीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार सुरू केला होता.
गैरप्रकारात राखीव दलाचा पोलीस…
रविवारी एकूण 15 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. परीक्षेतील गैरप्रकारात राज्य राखीव दलाच्या पोलिसाचाही समावेश आहे. अर्जुन हुलकुंद असे त्याचे नाव आहे. त्याच्यावरही माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.