प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील लॉकडाऊन संदर्भात घेण्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे शहरासाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे.
येथील लॉकडाऊन संदर्भात सनियंत्रण समितीची बैठक सोमवार ६ जुलै रोजी घेण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित असणाऱ्या एका माजी नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी बैठकीत उपस्थित असणाऱ्या सर्व नगरसेवक, समिती सदस्य, पोलीस अधिकारी, पालिका अधिकारी, मीडियातील कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईनचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या बैठकीत उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.