बाळ अपहरण प्रकरणी न्याय वैद्यक डॉ. मधू घोडकिरेकर यांची प्रतिक्रिया : उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निवाडय़ाचा सन्मान व्हावा
प्रतिनिधी / पणजी
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून मुलगा पळविणाऱया त्या महिलेचे नाव, पत्ता व तिचा फोटो पोलिसांनी उघड करायला नको होता. ती सुद्धा सामाजिक व्यवस्थेची बळी असून तिचे समुपदेशन होणे आवश्यक आहे. गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी म्हापसा प्रकरणात दिलेल्या निवाडय़ाच सन्मान व्हावा, असे मत सरकारी न्यायवैद्यक डॉ मधू घोडकिरेकर यांनी व्यक्त केले आहे.
या निवाडय़ाचा छडा लावण्यास पोलिसांना 24 तास लागले. सदर अपहरणहकर्ती महिला साधीभोळी म्हणून ती सापडली. जर एखाद्या टोळीने मुलाला पळविले असते तर पोलिसांचा कस खरोखरच पणाला लागला असता. या प्रकरणामुळे जे 25 पोलीस अधिकाऱयांचे पथक तयार झाले आहे. ते असेच कायम कार्यरत ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
आपल्या मुलांना बेवारस सोडणाऱया एका महिलेला म्हापसा पोलिसांनी अटक करून प्रसार माध्यमासमोर आणले होते त्यावेळी गोव्यातील उच्च न्यायालयाने सुमोटो पद्धतीने जनहित याचिका नोंदवून घेऊन पोलिसांना ताकीद दिली होती. या निवाडय़ाचा सन्मान राखण्यात यावा, असे डॉ. मधू घोडकिरेकर यांचे म्हणणे आहे.
हे आभास बाळ
पोलिसांनी अटक केलेली सदर महिला ‘आभास बाळ’ मानसिक विकाराची शिकार आहे. ती या समाज व्यवस्थेची बळी असून तिला अजून त्रास दिल्यास ती आत्महत्याही करू शकते. त्यासाठी तिचे समुपदेशन हेणे आवश्यक असल्याचे डॉ. मधू घोडकिरेकर म्हणाले. अनेक देशी विदेशी ग्रंथांचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, जेव्हा मूल होत नाही व मूल होण्याचा ताण वाढतो, तेव्हा त्या ध्यासाने खोटा गरोदरपणा येतो, मासिक पाळी बंद होते. पोटही वाढायला लागते व गरोदरपणाची लक्षणे दिसू लागतात. हा एक मानसिक विकार असल्याचे ते म्हणाले. या विकाराला आभास बाळ म्हणता येईल, असे त्यांनी सांगितले.
ती मुलाला पळविणारच होती
सदर मुलगा तिच्या हाती लागला नसता तर गोमेकॉच्या विभागातून एखादा मुलगा पळविणारच असती, अशी तिची मानसिक स्थिती होती. एका डॉक्टरने तिला ती गरोदार असल्याचे सांगितले, तेव्हापासून ती माहेरी राहायला लागली. व अधूनमधून ती गोमेकॉत जाऊन कोणी मूल देत असल्याचा अंदाज घ्यायची. परप्रांतीय महिला मूल घेऊन दिसल्यास मुलगा की मुलगी याची चौकशी करून त्यांच्या मागे लागायची.
13 दिवस घेतला ध्यास
यावेळी ती 13 दिवस गोमेकॉत तळ ठेकून राहिली. मुलांच्या वॉर्डबाहेर, प्रसूती विभागात, ओपीडीत तिने हेरगिरी सुरू केली. ती प्रसूतीसाठी इस्पितळात गेली आहे, असे तिने माहेरी व सासरी सांगितले होते. दि. 11 जून रोजी तिला मुलगा पळविण्याची संधी मिळाली. मुलगा एका महिन्याचा होता. त्यापेक्षा मोठा तिला चालला नसता.
हा मानसिक विकार
मूल पळविण्याचा सदर प्रकार म्हणजे न्यायवैद्यक मानसशास्त्रात चर्चीला जाणार एक दुर्मीळ प्रकार असल्याचे तज्ञ डॉ. घोडकिरेकर यांचे म्हणणे आहे. मुलगा नाही म्हणून घरच्यांकडून, नवऱयाकडून अवहेलना किंवा अपमान व्हायलाच हवे, असे काही नाही.
सदर महिला आपण गरोदर असल्याचे भासवून नंतर बाळाची चोरी करते, अशा बाळाला सुपोरिटीशीयस चाईल्ड, असे म्हणतात. याला शब्द कोशात अनुवादित शब्द नाही, यामुळे त्याला आभासी बाळ असे संबोधता येईल., असे सांगताना वेडेपणाच्या भरात खून केला त्याला माफी मिळू शकते. मूल पळविणाऱया या वेडय़ा महिलेकडे सहानुभूतीने पहायला हवे. तिच्या चार मुलींचा विचार व्हायला हवा. तिला कोठडीत डांबून न ठेवता, तिला जामिनावर सोडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा व तिला शिक्षा किती व्हावी हे न्यायदेवतेवर सोडायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे.