जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने दिला जामीन
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटकातील प्रसिद्ध सिनेगीतकार के. कल्याण यांच्या पत्नी, सासू, सासऱयाच्या अपहरण प्रकरणाला पोलीस तपासात धक्कादायक कलाटणी मिळाली होती. मालमत्ता हडप करण्यासाठीच मांत्रिकाने एका महिलेला कल्याण यांच्या घरी कामाला पाठविले होते. त्यानंतर दांपत्यामध्ये भांडण लावून मांत्रिकाने 5 ते 6 कोटी रुपयांची मालमत्ता हडप केली होती. या प्रकरणी शिवानंद बसवराज वाली (वय 38, रा. बुदिहाळ, ता. बिळगी, जि. बागलकोट) आणि गंगा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. शिवानंदला अटक करण्यात आली होती. मात्र विविध अटींवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. शिवानंद याच्यावतीने ऍड. श्रीधर मुतकेकर, ऍड. अश्विन कट्टी, ऍड. प्रकाश आर. यांनी काम पाहिले.
पोलिसांनी भोंदू मांत्रिक शिवानंदकडून 9 मॅक्सीकॅब, 350 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 किलो चांदी अशी एकूण 1 कोटीची मालमत्ता जप्त केला होती. शिवानंद या भोंदू मांत्रिकाने बेळगाव, बेंगळूर, हुबळी-धारवाड, अथणी, शिरहट्टी परिसरातील एकूण 5 ते 6 कोटी रुपयांची मालमत्ता हडप केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी के. कल्याण यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. आपली पत्नी अश्विनी, सासू राधिका सात्विक, सासरे कृष्णा सात्विक यांचे अपहरण झाल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले होते. मांत्रिक शिवानंद वाली व घरकामासाठी म्हणून आलेल्या गंगा कुलकर्णी या महिलेविरुद्ध अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या मधील शिवानंद वाली याला अटक करून त्याच्यावर भा.दं.वि. 365, 420, 368, 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील गंगा कुलकर्णी ही मात्र फरार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. शिवानंद वाली याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी होऊन शिवानंदला 50 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, न्यायालयाच्या आदेशाशिवाय बाहेर न जाणे, साक्षीदारांना धमकावू नये, पोलिसांना तपास करताना सहकार्य करणे, प्रत्येक रविवारी पोलीस स्थानकात हजेरी देणे या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.