ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी काल राज्य सरकारवर टीका करताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून वातावरण तापण्याची शक्यता दिसताच नीतेश यांनी आज ट्वीट करून आपले शब्द मागे घेतले आहेत.
12 आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजपने विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरवली होती. त्या भाग घेताना अनेक आमदारांनी सरकारवर टीका केली. शिवसेना व मुख्यमंत्र्यांना सातत्यानं लक्ष्य करणाऱ्या नीतेश राणे यांनाही प्रति विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी नीतेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
त्यावेळी बोलताना नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे आज तीव्र पडसाद उमटले. मुंबईत शिवसैनिकांनी रस्त्यावर येत नीतेश राणे यांचा पुतळा जाळला व माफीची मागणी केली. भविष्यात तोंड सांभाळून बोलावे, असा इशाराही दिला आहे.
हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन नीतेश राणे यांनी ट्वीट करत आपले शब्द मागे घेतले आहेत. ‘विधान भवनाबाहेर काल भाषण करताना आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी जे बोललो, त्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो. वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नव्हता, असे नीतेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.