मच्छीविक्रेत्यांना बजावली नोटीस
वार्ताहर / कट्टा:
कट्टा बाजारपेठ येथील मच्छीमार्केटमधील मासे साठवणूक करून ठेवत अस्वच्छ मासे विक्रीबाबत बाजारपेठेतील काही तरुणांनी आवाज उठवला होता. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाले होते.
या वृत्ताची ग्रामपंचायत कार्यालयाने लागलीच गंभीर दखल घेतली. ग्रामसेवक पी. डी. सरमळकर यांनी 4 रोजी संबंधीत सर्व मच्छीविक्रेत्यांना याबाबत मच्छीमार्केटमध्ये जाऊन नोटीस बजावली. यावेळी मच्छीविक्रेत्या शीतल जामसंडेकर, लक्ष्मी तांडेल, सुनीता धुरी, लक्ष्मी कांदळगावकर, सुजाता रोगे, सीताबाई जोशी, कुंदा कोयंडे, नीता रोगे, सुधा चव्हाण, रतन रोगे, शशिकला सावंत उपस्थित होत्या. मच्छीविक्रेत्यांना दिलेल्या या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे, यापूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये ग्रा.पं. सरपंच, सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱयांनी भेट देऊन मच्छीविक्री करताना योग्य खबरदारी घेण्याबाबत सक्त सूचना केल्या होत्या. तरीही आपण अस्वच्छ जुने भंगार बॉक्स, जुन्या फ्रिजमध्ये मच्छीची साठवणूक करून अस्वच्छ मच्छी विक्री करत आहात, असे निदर्शनास आले असून ही बातमी ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे याबाबत आपण कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही हे गंभीर आहे. ही नोटीस मिळताच चार दिवसांत मच्छी साठवणुकीचे बॉक्स, जुन्या भंगार फ्रिजचा वापर बंद करावा तसेच स्वच्छ व ताजी मच्छी विक्री करावी. तसे न केल्यास आपणास मच्छी विक्री करण्यास अटकाव केला जाईल व आपल्या विरुद्ध पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.