तपासाची चपे गतिमान : धागेदोरे सापडल्याची माहिती, लवकरच होणार उलगडा
प्रतिनिधी बेळगाव
भवानीनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी तपासाची चपे गतिमान झाली आहेत. जमीन वादातून त्याचा खून झाल्याचा संशय बळावला असून तपास अधिकाऱयांना धागेदोरे सापडल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
राजू मल्लाप्पा दोड्डबोमण्णावर (वय 41, मूळचा रा. हलगा-बस्तवाड, सध्या रा. संस्कृती फार्मस, मंडोळी रोड, भवानीनगर) याच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून तिक्ष्ण हत्याराने हल्ला करून मंगळवारी त्याचा खून केला होता. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. बुधवारी रात्री कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले असून लवकरच मारेकऱयांचा शोध घेण्यात येईल, असे सांगितले. चार दिवसांपूर्वी राजू राहत असलेल्या फार्म हाऊसवर काही जण गेले होते. रखवालदाराने त्यांना आत सोडले नाही. उलट राजूलाच त्यांनी गोवावेसजवळ आणले. एका हॉटेलात तासभर चर्चा झाली होती. हॉटेलमध्ये चर्चा करणारे कोण? याचाही तपास सुरू आहे.