पांढरवाडीकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : रिपोर्टसची वाट न पाहता मृतदेह ताब्यात दिला
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना टेस्टसाठी स्वाब टेस्ट घेतल्यानंतर त्याच्या रिपोर्ट्सची वाट न पाहता तातडीने मृतदेह ताब्यात का दिला? याची चौकशी करावी. आम्हा परिवार व गावातील नातेवाईकांना या घटनेनंतर पूर्ण हादरा बसला असून नाहक मनस्ताप करण्याची वेळ गावकरी व नातेवाईकांच्या वर आली आहे. अशा बेजबाबदार सातारा हॉस्पिटलचे चालक मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांच्या रुग्णालयाचा मान्यता रद्द करण्याची पांढरवाडी, ता. माण येथील नंदकिशोर प्रताप पवार व परिवाराने केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून त्यात म्हटले आहे की, माण तालुक्यातील पांढरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जाधववाडी गावातील जयश्री प्रताप पवार वय 72 यांच्यावर डॉ. सुरेश शिंदे यांच्या सातारा हॉस्पिटलमध्ये दमा व किडनी या रोगावर उपचार सुरु होते. त्यांचे दि. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या कोरोना टेस्टसाठी स्वाब घेऊनही त्याचा रिपोर्ट न पाहताच रूग्णालयीन प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन हात झटकण्याचे काम केले आहे.
त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना दिली असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी रुग्णालयातील प्रशासनाने हालचाल सुरू केली. दरम्यान त्याचा मुलगा नंदकिशोर पवार याने उद्या सकाळी लवकर मृतदेह ताब्यात घेतो असे सांगून दि 7 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता शववाहिनीतून जाधववाडी याठिकाणी घरी व तद्नंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवार दि. 8 रोजी दुपारी 4 वाजता सातारा हॉस्पिटलमधून संबंधित परिवारास कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचे फोनवरून कळविण्यात आले. त्यामुळे परिवारासह सर्व गावातील लोक भयभीत झाले आहेत.
कोरोना कोविड 19 च्या स्वाब टेस्ट घेतल्या नंतर त्याच्या रिपोर्ट्सची वाट न पाहता तातडीने मृतदेह ताब्यात का दिला. याची चौकशी करण्यात येऊन आम्हा परिवाराच्या व गावातील नातेवाईकांना या घटनेनंतर पूर्ण हादरा बसला असून नाहक मनस्ताप करण्याची वेळ गावकरी व नातेवाईकांचे वर आली असून अशा बेजबाबदार सातारा हॉस्पिटलचे चालक मालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांच्या रुग्णालयाचा मान्यता रद्द करण्याची मागणी पवार परिवाराने केली आहे.