ऑनलाईन टीम / श्रीनगर :
त्रालमध्ये धमकीची पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी दहशतवाद्यांच्या पाच मदतकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, धमकीची पोस्टर्स आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
गुलाम नबी पास, मोहम्मद पास, मोहम्मद रमजान लोन, अब्दुल रशीद भट आणि कासार अहमद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, हे सर्वजण त्रालचे रहिवासी आहेत.
काश्मीरमध्ये 23 जानेवारी रोजी त्राल भागातील सीर आणि बटागुंड या गावांमध्ये दहशतवादी संघटनेने धमकीची पोस्टर्स चिकटवली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. तपासादरम्यान काही ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे पाच संशयित आरोपींना अटक केली.