इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कारखाना तेलंगणात होणार- 25 हजार जणांना रोजगार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
टेस्ला कंपनीची स्पर्धक कंपनी त्रिटॉन येत्या काळात 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून भारतातील तेलंगणा राज्यात कंपनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात तेलंगणा राज्य सरकारबरोबर कंपनीने सहकार्याचा करारही (एमओयु) केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्रिटॉन ही एलॉन मस्क यांच्या मालकिच्या टेस्ला कंपनीची स्पर्धक कंपनी म्हणून अमेरिकेमध्ये चांगलीच लोकप्रिय झालेली आहे. कंपनी तेलंगणातील जहीराबादमध्ये 2 हजार 100 कोटी रुपये गुंतवणुकीमार्फत त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प राबवणार आहे. याअंतर्गत स्थानिक पातळीवर 25000 युवकांना नोकरीची संधी उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये त्रिटॉन कंपनी 50 हजार इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार आहे, यामध्ये सेमीट्रक, सेडान, लक्झरी सुव्ह कार्स व रिक्षा यांचा समावेश असेल.
विदेशातही होणार निर्यात
त्रिटॉन कंपनीच्या या कारखान्यामधून निर्मिती करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात शेजारच्या बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि मध्य आशियातील देशांमध्येही केली जाणार असल्याचे त्रिटॉन कंपनीचे सीईओ हिमांशू पाटील यांनी सांगितले आहे.