समितीच्या अध्यक्षपदी दुर्गेश शिरोडकर
प्रतिनिधी
फेंडा
कुर्टी-फोंडा येथील (गोवा डेअरी) गोवा दुध उत्पादक संघाचा ताबा नुकत्याच सहकार खात्याने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने घेतला. समितीच्या अध्यक्षपदी दुर्गेश शिरोडकर असून सीए यशवंत कामत व सहाय्यक निबंधक अवित नाईक यांची सदस्यपदी समावेश आहे. अध्यक्षपदी निवड झालेल्या दुर्गेश शिरोडकर यांच्याकडे काल सोमवारी प्रशासक अरविंद खुटकर यांनी रितसर गोवा डेअरीचा ताबा दिला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
गोवा डेअरीवर प्रशासकांना वगळून त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीची स्थापनेचा आदेश सहकार निबंधक विकास गावणेकर यांनी शुक्रवार 29 मे रोजी जारी करण्यात आला होता. गोवा सहकार संस्था कायद्याअंतर्गत कलम 67अ आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. दुर्गेंश मधुकर शिरोडकर हे सांतेमल-राय सासष्टी येथील सातेरी दुध व्यवसायिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. कांपाल पणजी येथील वाय व्ही कामत ऍन्ड कंपनीचे सीए यशवंत कामत तसेच पणजी येथील मुख्य कार्यालयातील सहाय्यक निबंधक अवित नाईक यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले की डेअरीची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतरच दुध उत्पादकांच्या हितासाठी निर्णय घेणार असल्याचे सांगितले. डेअरीत झालेल्या घोटाळेखोरांवरील कारवाईसाठी डेअरीतर्फे पुर्ण सहकार्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुध संकलनासाठी मोठी मजल गाठण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. दरम्यान अध्यक्ष शिरोडकर यांनी डेअरी खाते प्रमुखांशी चर्चा करून, बंद असलेल्या आईस्क्रिम प्लांट, पशुखाद्य प्रकल्पाची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
डेअरीतील घोटाळेखोरांविरूद्ध चौकशीलाही कालपासूनच सुरूवात झालेली आहे, तसेच त्रिसदस्यीय समितीनेही ताबा कालपासूनच घेतला हा निव्वळ योगायोग की घोटाळेखोराविरोधात डेअरीने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
2017 पासून चारवेळा डेअरीवर प्रशासकाची निवड
साल 2017 पासून ते आजपर्यंत गोवा डेअरीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीच झाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. घोटाळय़ाची चौकशी पुढे सरकरतच नाही. संचालक मंडळाच्या बरखास्तीनंतर प्रशासकाची निवड व एमडीचे घोटाळे यामुळेच डेअरी कायम चर्चेत राहिलेली आहे. पशुखाद्याच्या वाढीसाठी आंदोलन मात्र नंतर माघार असे प्रकार सुरूच आहे.
गोवा डेअरीवर निवडून आलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ 29 जानेवारी 2017 रोजीपासून सुरू झाला होता. 31 मे 2017 रोजी माधव सहकारी अध्यक्षपदी त्यानंतर 8 मे 2018 रोजी राजेश फळदेसाई झाल्यानंतर दोनवेळा संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. 6 सप्टेबर 2018 रोजी प्रशासक म्हणून दामोदर मोरजकर यांची निवड करण्यात आली. 28 जानेवारी 2019 रोजी संतोष कुंडईकर त्यानंतर 17 ऑगस्ट 2019 रोजी विलास नाईक यांची शेवटी 1 ऑक्टो 2019 ते कालपर्यंत प्रशासक म्हणून अरवेंद खुटकर यांच्याकडे कार्यभार होता.