शाहूपुरी (सातारा) : मागील चार दिवसात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने जिल्हाभरात थंडी, तापसदृश्य साथीने नागरिक बेजार झाले आहेत. घरटी असे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या भीतीने ग्रासलेल्या स्थितीत हे नवे संकट आले आहे.
वाहणाऱ्या थंड वाऱ्याने जिल्हावासीय बेजार झाले आहेत. दक्षिणेत तामिळनाडूसह किनारपट्टीला वादळी वारे बडवत असताना त्याचे पडसाद जिल्ह्यात गेले दिवस उमटत आहेत. दिवसभर दमट हवा, पूर्वेकडून वाहणारे वारे, रात्री उशिरानंतर पडणारी थंडी यामुळे सारेच बेजार आहेत. हवामानातील हा अचानक बदल मात्र अनेकांना त्रासदायक ठरतो आहे. अनेकजणयामुळे आजारी पडले असल्याचे दिसून येत आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कमी झालेली दवाखान्यांमधील गर्दी आता पुन्हा वाढत आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया रुग्णही आढळत आहेत. प्रत्येकामध्ये लक्षणे वेगवेगळी आढळत आहेत. लक्षणे चिकुनगुनियाची असली तरी प्रयोगशाळेतील चाचणी मात्र निगेटिव्ह येते असे डॉक्टरांचे निरिक्षण आहे. घराबाहेर पडताना थंड वाऱ्यापासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.