गत हंगामातील एफआरपी शिल्लक रक्कम तातडीने द्या! : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन
वार्ताहर / औंध
गेल्या हंगामातील राहिलेली एफआरपीची शिल्लक रक्कम तातडीने द्या आणि चालू गाळप हंगामातील ऊसाची एफआरपी एकरकमी देण्याची घोषणा करा तरच उसाला कोयता लावा; अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्सकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की ऊस नियामक कायदा 1966 नुसार गाळपाला आलेल्या ऊसाचे चौदा दिवसात पैसे शेतकयाला देणे बंधनकारक आहे मात्र आपण शेतकयांची देणी मुदतीत अदा न करता कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. दुसरीकडे गोपूज कारखाना यंदाचा गाळप हंगाम येत्या तीन चार दिवसात सुरू करणार आहे. मात्र मागील गाळप हंगामातील उसाची एफआरपी 1850 रूपये जमा केली आहे तर उरलेले 690 रुपये थकीत आहेत. दुसरीकडे गेल्या हंगामातील ऊस उत्पादक आणि शेअर्सधारकांची साखरही मिळाली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात एफआरपी ची राहिलेली 690 रुपयांची रक्कम आणि साखर वाटप करावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर स्वाभिमानाचे राज्यप्रवक्ते अनिल पवार,तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे,युवक जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, विनोद खराडे,श्रीकांत लावंड आदींच्या सह्या आहेत.