आदित्य रॉय कपूरसाब्sात झळकणार
बॉलिवूडमध्ये मागील काही काळापासून दक्षिणेतील सुपरहिट चित्रपटांच्या रिमेकचे प्रचलन वेगाने वाढले आहे. तमिळ सुपरहिट चित्रपट ‘थडम’च्या हिंदी रिमेकची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. यात आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री मृणाल ठाकुर हिची नायिका म्हणून निवड करण्यात आल्याचे समजते. मृणालने सोशल मीडियावर यासंबंधी माहिती दिली आहे.
मृणालने आदित्यसोबतचे एक छायाचित्र प्रसारित केले आहे. ही सामना करण्याची वेळ आहे, तमिळ हिट चित्रपट थडमच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक असून याचे दिग्दर्शन वर्धन केतकर करणार असल्याचे मृणालने म्हटले आहे.
थडमच्या हिंदी रिमेकची निर्मिती भूषण कुमार आणि मुराद खेतानी करत आहेत. हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित ऍक्शन-थ्रिलर असणार आहे. मूळ तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन मगिज तिरुमेनी यांनी केले होते. यात अरुण विजय, तान्या होप, स्मृती वेंकट आणि विद्या प्रदीप मुख्य भूमिकेत होते.
मृणाल याचबरोबर शाहिद कपूरसोबत ‘जर्सी’ चित्रपटात दिसून येणार आहे. तर आदित्य ‘ओम- द बॅटल विथइन’ चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात संजना सांघी नायिकेची भूमिका साकारत आहे.