जिल्हय़ात विविध ठिकाणी नाकाबंदी, साताऱयात 13 तर कराडात 34 जणांवर कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
शुक्रवार दि. 31 डिसेंबर रोजी रात्री 9 नंतर मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱया व विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांनी कारवाया केल्या. जिल्हय़ात विविध ठिकाणी नाकाबंदी करत संशयित वाहने पकडून त्यांची तपासणी करण्यात येत होती. सातारा शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱया 13 जणांवर वाहतुक शाखेने धडक कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच कराडमध्ये पोलिसांनी नाकाबंदी करत तब्बल 34 जणांवर कारवाया केल्या आहेत. यासह जिल्हय़ात विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कारवाया झाल्या आहेत.
कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही निर्बंध आणले असल्यामुळे अनेकांनी शुक्रवारी 31 डिसेंबर आपल्या घरीच साजरा केला. वाहतूक शाखेच्या पथकाने पोवईनाका, राजवाडा, मोती चौक, शाहू चौक, बोगदा, बॉम्बे रेस्टॉरंट, मोळाचा ओढा, वाढे फाटा, अजंठा चौक येथे शुक्रवारी सायंकाळी सात नंतर नाकाबंदी करत वाहनचालकांची तपासणी केली असता त्यामध्ये 13 वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले. त्या सर्वांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस दलाच्यावतीने रात्री 9 नंतर बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आले होते. रात्रीची संचारबंदी जारी करण्यात आली होती. या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱया नागरिकांवर सातारा शहर सातारा, सातारा तालुका, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकांनी कारवाई केली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने कास, यवतेश्वर, परळी खोरे येथे वनविभागाच्या हद्दीत तपासणी केली असता त्याठिकाणी कोणीही आढळून आले नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत पथकाने रात्रगस्त घातली.
कराडमध्ये 34 जणांवर कारवाई
कराड ः 31 डिसेंबरच्या रात्री जमावबंदी असतानाही नियमाचे उल्लंघन करत हुल्लडबाजी करणाऱया 34 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कराड, मलकापूरसह परिसरात पोलिसांनी बॅरिगेट लावून कडक बंदोबस्त ठेवला होता.
जिह्यात कोरोना रुग्णवाढ आटोक्यात असली, तरी ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. ओमायक्रॉनला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध काही प्रमाणात वाढवले आहेत. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवरही प्रशासनाने निर्बंध आणले. त्यामुळे शुक्रवारी रात्री कराड, मलकापूर, सैदापूर परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. ढेबेवाडी फाटा, कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोलपंप, पृष्णा नाका, सैदापूर कॅनॉल, वारूंजी फाटा, कार्वे नाका या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीत प्रत्येक वाहन तपासले जात होते. विनाकारण फिरणारे आढळले, की त्यांच्यावर कारवाई केली जात होती. पोलिसांनी अशा 34 जणांवर कारवाईचा बडगा उगारला.