प्रतिनिधी / बेळगाव
मोबाईलवर डिजिटल घडय़ाळ आल्यामुळे मनगटी घडय़ाळे आता अनेकजण वापरत नाहीत. त्यात महत्त्वाच्या ठिकाणी लावलेल्या घडय़ाळांचे महत्त्वही काळाच्या ओघात कधीच मागे सरले. शहरात अनेक ठिकाणी मोठमोठी घडय़ाळे आहेत. येथील धर्मवीर संभाजी चौकात सर्वांचे लक्ष वेधणारे घडय़ाळदेखील काळाच्या ओघात लुप्त होत चालले आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
येथील घडय़ाळ बंद पडून अनेक महिने झाले. मात्र, याच्या दुरुस्तीकडे कोणीच लक्ष पुरवत नसल्याचे निदर्शनास येत आहे. न्यायालय परिसरातील घडय़ाळ, गणपत गल्लीतील घडय़ाळ, रेल्वे स्टेशन, धर्मवीर संभाजी चौक यासह अनेक ठिकाणी मोठमोठी घडय़ाळे लावण्यात आली आहेत. मात्र, यातील काही घडय़ाळे बंद पडली असून त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधितांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या घडय़ाळांची दुरुस्ती करण्यात आली तरी धर्मवीर संभाजी चौकातील घडय़ाळाचे काटे जेव्हा पहावे तेव्हा थांबलेलेच दिसतात. आजच्या धावपळीच्या युगात सर्वांकडे मोबाईलवरील डिजिटल घडय़ाळ, किंवा मनगटावरील घडय़ाळ असले तरी हमखास येथील बंद पडलेल्या घडय़ाळाकडे एक नजर जातेच. त्यामुळे थांबलेल्या घडय़ाळांचे काटे कधी वेग धरणार? याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.