चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारतीय प्रतिनिधित्वाची संधी, हिमा दासला दुखापतीमुळे पात्रता मिळवण्यात अपयश
पतियाळा / वृत्तसंस्था
अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनियाने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट निश्चित केले आहे. येथील राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेत 63.72 मीटर्सची फेक करत सीमा सुवर्णपदकाची मानकरी ठरली. शिवाय, इथेच तिचे ऑलिम्पिकमधील स्थानही निश्चित झाले.
37 वर्षीय सीमा पुनियाने यापूर्वी 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर 2018 आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली असून येथे तिने 63.50 मीटर्सचा ऑलिम्पिक क्वॉलिफाईंग मार्क सहज पार केला. सीमा पुनिया रविवारी मध्यरात्री मिन्स्कमधून थेट पतियाळाला पोहोचली आणि या राष्ट्रीय स्पर्धेत तिने ऑलिम्पिक पात्रता संपादन केली. मिन्स्कमध्ये मागील आठवडय़ात संपन्न झालेल्या बेलारुस ओपन चॅम्पियनशिपमध्येही ती सहभागी झाली होती.
आपल्या 5 पैकी 4 थ्रोमध्ये तिने 60 मीटर्सचा मार्क पार केला आणि यातील चौथ्या प्रयत्नात तिने ऑलिम्पिक क्वॉलिफाईंग मार्कला सहज गवसणी घातली. सीमाने ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची यंदा ही चौथी वेळ असेल. यापूर्वी, 2004, 2012 व 2016 ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली होती.
सीमा ग्लटस् इन्जुरीवर उपचार करुन घेत असल्याने प्रदीर्घ काळ मैदानाबाहेर होती. याशिवाय, 2018 आशियाई स्पर्धेनंतर ती आपल्या केवळ तिसऱयाच स्पर्धेत उतरत होती. सीमाने मार्चमध्ये फेडरेशन चषक स्पर्धेत 62.64 मीटर्सची फेक केली. त्यानंतर 25 जून रोजी मिन्स्कमध्ये 58.62 मीटर्सवर तिला समाधान मानावे लागले. येथे मात्र दर्जेदार कामगिरी साकारत ऑलिम्पिकमध्ये स्थान संपादन करण्यात ती यशस्वी ठरली. ऑगस्ट 2004 नंतर 63 मीटर्सपेक्षा अधिक अंतराची फेक करण्याची तिची ही पहिलीच वेळ ठरली.
इव्हेंटमधील दुसरी भारतीय
टोकियो ऑलिम्पिक थाळीफेक इव्हेंटसाठी पात्र ठरणारी सीमा ही दुसरी भारतीय महिला ऍथलिट ठरली. यापूर्वी, राष्ट्रीय विक्रमधारक कमलप्रीत कौरने देखील स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली आहे. मागील सोमवारी तिने 66.59 मीटर्सची लक्षवेधी फेक केली होती. कौरचा पतियाळात सध्या सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग अपेक्षित होता. मात्र, येथे ती उतरली नसल्याचे स्पष्ट झाले.
दुखापतीमुळे हिमा दास बाहेर
भारताची स्टार स्प्रिन्टर हिमा दासला शनिवारी 100 मीटर्स हिटमध्ये धावताना धोंडशिरेची दुखापत झाली असून यामुळे ती आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. हिमा दासचा सहभाग असलेल्या महिला संघाने 4ƒ100 रिलेमध्ये 44.15 सेकंद वेळ नोंदवली होती. हिमाने 200 मीटर्स फायनलमध्ये ऑलिम्पिक सहभाग निश्चित करण्याचा प्रयत्न केला. पण, 22.80 सेकंदाचा ऑलिम्पिक क्वालिफाईंग मार्क असताना हिमाला 25.03 सेकंदात हा इव्हेंट पूर्ण करता आला. केरळची पीडी अंजली व पंजाबचा लवप्रीत सिंग महिला व पुरुष 200 मीटर्स स्प्रिन्टमध्ये अनुक्रमे 24.01 सेकंद व 21.04 सेकंद वेळेसह विजेते ठरले.
4ƒ100 मिश्र सांघिक गटाशिवाय, अविनाश साबळे (पुरुष 3 हजार मीटर्स स्टीपलचेस), तजिंदर पाल सिंग तूर (पुरुष गोळाफेक), नीरज चोप्रा, शिवपाल सिंग (पुरुष भालाफेक), एम. श्रीशंकर (पुरुष गट लांब उडी), कमलप्रीत कौर (महिला गट थाळीफेक), केटी इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिला (पुरुष गट 20 किमी रेस वॉकिंग), भावना जाट, प्रियांका गोस्वामी (महिला गट) यांनी यापूर्वीच आपला ऑलिम्पिक सहभाग निश्चित केला आहे.
एमपी जबीर (पुरुषांची 400 मीटर्स अडथळय़ाची शर्यत), दुती चंद (महिला गट 100 व 200 मीटर्स), अनू राणी (महिला गट भालाफेक) हे आपल्या विश्व मानांकनाच्या बळावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील, अशी आशा आहे. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनची शनिवारी बैठक होत असून त्यात सहभागी ऍथलिटस्ची यादी जाहीर केली जाण्याचे संकेत आहेत.
गोल्फर अदिती अशोकचा सहभागही निश्चित
नवी दिल्ली ः भारताची आघाडीची महिला गोल्फपटू अदिती अशोक सलग दुसऱयांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. मंगळवारी जाहीर केल्या गेलेल्या क्वॉलिफाईंग लिस्टमध्ये तिला 45 वे स्थान मिळाले. अदितीप्रमाणे अनिरबन लाहिरी व उदयन माने यांचाही टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग असणार आहे. अर्जेन्टिनाच्या इमिलियानो ग्रिलोने माघार घेतली असल्याने उदयन मानेचा ऑलिम्पिक सहभाग निश्चित झाला. 6 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशन अंतिम यादी जाहीर करणार असून यावर त्यावेळी शिक्कामोर्तब होईल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटातील गोल्फ इव्हेंट दि. 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत तर महिला गटातील इव्हेंट 4 ते 7 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत.
पुरुष दुहेरीमध्ये बोपण्णा-दिविजची संधी हुकली
नवी दिल्ली ः रोहन बोपण्णा व दिविज शरण यांना पात्रता मिळवता न आल्याने टेनिस इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या भारताच्या आशाअपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. बोपण्णा (38) व दिविज (75) यांचे एकत्रित मानांकन 113 इतके कमी असल्याने मोठय़ा प्रमाणात स्पर्धकांनी माघार घेतली तरच दि. 16 जुलैच्या कटऑफ डेटपर्यंत या उभयतांना थोडीफार अपेक्षा करता येईल. कोव्हिड-19 मुळे अनेक निर्बंध लादले गेले व अनेक स्पर्धा रद्द केल्या गेल्या. याचा या जोडीला प्रामुख्याने फटका बसला. 1992 बार्सिलोना ऑलिम्पिकनंतर भारतीय पुरुष दुहेरी जोडी सहभागी होत नसल्याची ही पहिलीच वेळ असेल. 1992 मध्ये पेस व रमेश कृष्णन यांनी प्रतिनिधीत्व केले. 2016 मध्ये पेस व बोपण्णा स्पर्धेत उतरले. मात्र, त्यांना पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता.